औरंगाबाद : भीमा कोरेगाव येथील -दंगलीत मरण पावलेल्या राहुल फटांगडे या तरुणाच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने २५ लाख रुपये मदत आणि घरातील एका जणाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गुरूवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणाले की, भीमा-कोरेगाव घटनेचा मराठा क्र ांती मोर्चाने जाहिर निषेध नोंदविला आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या भीडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटे हे असल्याचे समोर आल्यानंतरही पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केली नाही. असे असताना मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी आणि दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने अमरावतीचे भाजपा आमदार अनिल बोंढे यांनी या घटनेमागे मराठा क्रांती मोर्चा असल्याचे बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या मराठा क्रांती मोर्चा निषेध करीत असून दोन समाजात तेढ निर्माण करणार्या आमदार बोंढे यांना तातडीने अटक करा, अशी मागणी मोर्चा करीत आहे.
मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी आम्ही ५८ मोर्चे काढले. आमचे मोर्चे कोणत्याही समाजाविरोधात नव्हते, हे मागासवर्गिय समाजाला माहित आहे. शिवाय मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दलित वसाहतीमध्ये जाऊन बैठका घेत आहेत. जातीयवादी प्रवृत्तीचे हे कट कारस्थान असून ते उधळून लावण्याचे आवाहन क्रांती मोर्चा करीत आहे. भीमा कोरेगाव, वढू बु., सणसवाडी आणि राज्यातील विविध भागात जनतेच्या वाहनांचे आणि स्थावर व जंगम मालमत्तेचे तीन दिवसात मोठे नुकसान झाले. तहसीलदारामार्फत या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे. ज्यांचे नुकसान झाले त्यांना आठ दिवसात शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. भीमा कोरेगाव येथे लाखोच्या संख्येने समाज अभिवादनासाठी येणार असल्याचे माहित असूनही पोलीस प्रशासनाने योग्य तो बंदोबस्त न ठेवल्याने ही घटना घडली. यामुळे या घटनेला जबाबदार गृहमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री असून त्यांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्यावर कारवाई करावीऔरंगाबाद शहरात दंगलसदृश्य परिस्थिती असताना शहराचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव हे रजेवर निघून गेले. एवढेच नव्हे तर त्यांनी आणलेले चिली ड्रोनही पोलिसांनी वापरले नाही. पोलीस आयुक्तांच्या रजेवर जाण्यामुळे शहरातील कायदा- व सुव्यवस्थेची परिस्थिती चिघळली. यामुळे पोलीस आयुक्तांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी यावेळी समन्वयकांनी केली.