छत्रपती संभाजीनगर : छावणी परिषदेचा मनपात समावेश करण्यासाठी काही वर्षांपासून प्रक्रिया सुरू आहे. परिषदेचे अधिकारी व मनपा अधिकारी यांच्यात वारंवार बैठकाही होत आहेत. अलीकडेच झालेल्या एका बैठकीत महापालिकेने छावणी भागातील नागरी वसाहतीसह लष्करी भागही द्यावा, अशी आग्रही मागणी केली आहे. महापालिकेला खाम नदी आणि अन्य ठिकाणी विकास कामे करण्यात अडचणी येत आहेत.
देशभरातील छावणी परिषदांचा महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. आतापर्यंत पाचपेक्षा अधिक छावणी परिषदांचा समावेशही करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिषदेचा मनपात समावेश करण्यासाठी दोन वर्षापासून प्रक्रिया सुरू आहे. याबाबत अगोदर केंद्र, राज्य शासनाने छावणी परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागविले होते. त्यानंतर महापालिकेच्या आयुक्तांकडून अभिप्राय मागवण्यात आले. हे दोन्हीही अभिप्राय राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने छावणी परिषदेचे निवासी आणि व्यावसायिक क्षेत्र महापालिकेत सामावून घेण्याचे ठरवले आहे, तसा प्रस्ताव महापालिकेने शासनाला पाठवला आहे. छावणी परिषदेतील वसाहतींना सध्या महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. स्वच्छता, आरोग्य सेवा छावणी परिषद देते.
दरम्यान मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्यासह छावणी परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. छावणी परिषदेच्या निवासी भागासह लष्करी भाग देखील महापालिकेला द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे, असे जी. श्रीकांत यांनी पत्रकारांना सांगितले. शहरातून वाहणाऱ्या खाम नदीचा बराच भाग लष्करी भागातून जातो. हा भाग महापालिकेत आल्यावर नदीच्या दोन्ही बाजूंनी कामे महापालिकेला करता येतील, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले.