औरंगाबाद : महाभयंकर पावसामुळे पटरीलगत वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने आजारी आई-वडिलांची आधारस्तंभ रुपाली वाहून गेली, त्यातच तिचा मृत्यू झाला. तिच्या कुटुंबाला दहा लाखांची मदत मनपाने करावी, अशी मागणी एका शिष्टमंडळाने केली आहे.
दादाराव गायकवाड हे आपल्या कुटुंबासह येथे राहतात तर ते मिस्त्री काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. रुपाली ही त्यांची कमावती मुलगी असून, तीच आपल्या आई-वडिलांचा आधार म्हणून एका कंपनीत नोकरी करून घरखर्च म्हणून आपल्या वृद्ध व आजारी आई-वडिलांना मदत करीत होती.
रुपाली गायकवाडने बीसीएस (BCS) ची डिग्री घेतलेली होती. आणखी पुढचे शिक्षण घेऊन आपल्या वृद्ध आई-वडिलांना मदत करायची होती.
रुपालीचा मृत्यू हा केवळ महानगरपालिकेच्या हलगर्जीमुळे झाला आहे. जर महापालिकेने पटरीलगतचा रस्ता केला असता तर कदाचित रुपाली वाचली असती. तिच्या कुटुंबाचा आधार गेला नसता, करिता महापालिकेने रुपालीच्या कुटुंबास तत्काळ १० लाख रुपये मदत म्हणून द्यावी. पुन्हा दुसऱ्या कुणाचा मृत्यू होऊ नये, यासाठी तत्काळ पटरीलगतच्या रोडचे काम करावे, अशी मागणीही भाकपचे शहर सहसचिव मधुकर खिल्लारे, ॲड. महेश खरात, स्थानिक रहिवासी बालाजी पद्दीरवाड यांनी केली आहे.
रूपाली गायकवाडच्या कुटुंबीयांना मनपाने तत्काळ १० लाखाची मदत करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने मनपाकडे करताना मधुकर खिल्लारे, ॲड. महेश खरात, बालाजी पद्दीरवाड आदी.