औरंगाबाद : डाळिंबाच्या अधिक आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी उच्च दर्जाची रोपे पुरवणे गरजेचे आहे. याकरिता कृषी विद्यापीठअंतर्गत असणाऱ्या विविध संस्थांमार्फत रोपवाटिका उभारून त्याद्वारे चांगल्या गुणवत्तेची रोपे शेतकऱ्यांना दिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नक्कीच भर पडेल, असे मत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी गुरुवारी व्यक्त केले.
कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३ दिवसीय ऑनलाईन डाळिंब पीक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात डॉ. ढवण बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अटारी, पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग, डॉ. ज्योत्स्ना शर्मा, परभणीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे आदींची उपस्थिती होती.
डॉ. शर्मा यांनी डाळिंबातील एकात्मिक रोग व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. मोटे यांनी फळबाग वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत करण्यात येणाऱ्या विविध बाबींची माहिती शेतकऱ्यांना दिली. या ऑनलाईन कार्यक्रमात महाराष्ट्र व इतर राज्यांतील शेतकरी, शास्त्रज्ञ, विस्तार कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शुक्रवारी विविध हंगामातील डाळिंब पिकाचे पाणी व्यवस्थापन या विषयावर डॉ. पी. शिरगुरे यांचे, तर डाळिंबातील प्रक्रिया व मूल्यवर्धन या विषयावर डॉ. नीलेश गायकवाड यांचे मार्गदर्शन होणार आहे.
सूत्रसंचालन कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विषय विशेषज्ञ डॉ. बसवराज पिसुरे यांनी केले.