---
शिक्षक समितीची मागणी
---
औरंगाबाद : शिक्षकांवर कोरोना सर्वेक्षणासाठी सुरक्षा सुविधा न दिल्याने शिक्षकांत असंतोष आहे. त्यामुळे कोरोना काळात काम करण्यासाठी विमा सुरक्षेचे कवच देण्याची मागणी शिक्षक समितीचे अध्यक्ष विजय साळकर यांनी केली आहे.
घरोघरी जाऊन कुटुंब सर्वेक्षण, वाहनांची तपासणी, स्वस्त धान्य दुकानांचे पर्यवेक्षण, कोविड सेंटरवर चौकशी अधिकारी अशा विविध कामांसाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या कामासाठी आवश्यक असणारे विमासुरक्षा कवच यावर्षी शिक्षकांसह आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांना शासनाकडून देण्यात आले नाही. मागील वर्षीच्या विमा सुरक्षा कवचाची मुदत ३० सप्टेंबरला संपली आहे. त्यास मुदतवाढ देऊन नवीन विमा सुरक्षा कवच द्यावे. तसेच सॅनिटायझर, मास्क, थर्मलगन, ऑक्सिमीटर, पीपीई कीट तसेच इतर आवश्यक साहित्यसुद्धा पुरवावे, अशी मागणी अध्यक्ष विजय साळकर, रणजित राठोड, नितीन नवले, श्याम राजपूत, शालिकराम खिस्ते, गुलाब चव्हाण, सतीश कोळी, आदींनी केली आहे.