औरंगाबाद : रुग्ण आजारी असताना अनेकदा काही वैद्यकीय उपकरणांची खरेदी करावी लागते. वैद्यकीय खर्च एवढे महागडे असताना त्यात उपकरणांची खरेदी करणे सर्वसामान्यांसाठी खूपच अवघड होते. याशिवाय रुग्ण बरा झाल्यावर ही महागडी उपकरणे घरात पडून राहतात. त्यामुळे सेवानिवृत्त मंडळींनी पुढाकार घेऊन ‘रुग्ण सेवा मंडळ’ची सुरुवात केली आणि आजारी व्यक्तींच्या कुुटुंबियांना एक मदतीचा हात दिला.
एस. के. देशमुख, दिलीप परांजपे, संजय अष्टूरकर, विवेक दिवटे यांच्यासह अजून काही सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांनी सप्टेंबर २०१८ मध्ये एकत्र येऊन स्वत:च्या पैशातून काही वैद्यकीय उपकरणांची खरेदी केली आणि सिडकोमधील एन- ४ परिसरात रुग्ण सेवा मंडळ सुरू केले. सेमी फाऊलर बेड, व्हील चेअर, वॉकर, कमोड चेअर, कुबडी, एअर बेड, वॉटर बेड, नेब्युलायझर, सलाईन स्टँड, साईड स्टँड, वॉकिंग स्टीक यांसारखी उपकरणे सध्या या मंडळात आहेत.
ज्या रुग्णाला यापैकी एखादे पाहिजे असेल, त्यांनी काही रक्कम मंडळात अनामत रक्कम (डिपॉझिट) म्हणून ठेवायची आणि त्यांना हवे असणारे उपकरण पाहिजे तेवढे दिवस विनामूल्य वापरायचे, अशा स्वरूपात या मंडळाचे काम चालते. ज्यांच्याकडे अनामत रक्कम भरण्याइतकेही पैसे नाहीत, अशा रुग्णांची जबाबदारी मंडळातील सदस्यांपैकीच एक जण उचलतात.
७५ रुग्णांना लाभआम्ही पुण्याला अशा प्रकारे काम करणारा ग्रुप पाहिला होता. आपल्याकडे वैद्यकीय उपकरणे भाड्याने मिळतात; पण अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांना या उपक रणाचे भाडे भरणेही शक्य नसते. त्यामुळे मग आम्ही औरंगाबाद शहरात या मंडळाची सुरुवात के ली. आज ७५ रुग्ण या उपक रणांचा लाभ घेत आहेत. जर एखाद्या रुग्णाचा फोन आला आणि आमच्याकडे जर त्याने मागितलेले उपकरण उपलब्ध नसेल, तर आम्ही तात्काळ ते आमच्या पैशाने खरेदी करतो आणि रुग्णाकडे पोहोचवतो. ज्यांच्या घरात वापरात नसलेली वैद्यकीय उपकरणे पडून असतील, तर अशी उपकरणेही आम्ही दान स्वरूपात स्वीकारतो. - दिलीप परांजपे