छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ. वाल्मीक सरवदे यांची तर डॉ. महेंद्र शिरसाट, डॉ. संजय साळुंके, डॉ. वीणा हुंबे आणि डॉ. वैशाली खापर्डे यांची अधिष्ठातापदी नवनियुक्त कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी नियुक्ती केली आहे. पूर्णवेळ प्र-कुलगुरू व अधिष्ठातांची नेमणूक होईपर्यंत हे प्रभारी अधिकारी काम पाहणार आहेत.
तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा ३१ डिसेंबर रोजी कार्यकाळ संपल्यानंतर पुण्याचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता. डॉ. गोसावी यांनी काही दिवसांसाठी पद असल्यामुळे प्रभारी प्र-कुलगुरू, अधिष्ठातांची नियुक्ती केली नव्हती. नवनियुक्त कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सोमवारी सायंकाळी तात्पुरती टीम तयार केली. या नियुक्त्यांमुळे विद्यापीठाचे शैक्षणिक कामकाज सुरळीत होण्यास मदत होईल. १ जानेवारीपासून अधिकारी नसल्यामुळे कामकाज खोळंबले होते. त्यामुळे कुलगुरू डॉ. फुलारी यांनी नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता डॉ. सरवदे यांची प्र-कुलगुरूपदी वर्णी लावली आहे. त्यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. नव्या अधिनियमानुसार आता व्यवस्थापन परिषद आणि कुलगुरू यांनी सामंजस्याने प्र-कुलगुरूंची निवड करायची असते. त्यामुळे डॉ. सरवदे यांच्याकडे पूर्णवेळ प्र- कुलगुरूंची जबाबदारीदेखील येण्याची चिन्हे आहेत. पूर्वी कुलगुरूंच्या शिफारशीनुसार राज्यपाल तथा कुलपती प्र-कुलगुरूंची निवड करत होते. तसेच कुलसचिव म्हणून काम पाहिलेले डॉ. महेंद्र शिरसाट यांची तब्बल पाच वर्षांनी प्रशासनात पुन्हा ‘एन्ट्री’ झाली आहे. त्यांना विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता केले आहे. त्याशिवाय मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून डॉ. संजय साळुंके, वाणिज्यच्या प्रमुख डॉ. वीणा हुंबे यांच्याकडे वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचा कार्यभार सोपवला आहे. प्रभारी ग्रंथपाल डॉ. वैशाली खापर्डे यांच्याकडे आंतरविद्याशाखेचे काम सोपवले आहे.
सर्वसमावेश नियुक्त्या व्हाव्यातविद्यापीठाच्या प्राधिकरणांवर नियुक्त्या करताना सर्वांना विश्वासात घेऊन, सर्वसमावेश नियुक्त्या झाल्या पाहिजेत. एका विशिष्ट विचारसरणीच्या व्यक्तींनाच प्रतिनिधित्व देण्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. ते नवनियुक्त कुलगुरूंनी टाळले पाहिजे, अशी प्रतिक्रिया व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अंकुश चव्हाण यांनी दिली.