औरंगाबाद : उपचारासाठी दाखल असलेल्या मनोरुग्णाने एमजीएम रुग्णालयात टॉयलेटमधील एक्झॉस्ट पंख्याला रुमाल बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता समोर आली. याप्रकरणी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
रामेश्वर हिम्मतराव काकडे (५२, रा. बोरागाव, जिल्हा बुलडाणा) असे मयत रुग्णाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार रामेश्वर हे गेल्या काही महिन्यांपासून मनोरुग्ण झाले होते. नातेवाईकांनी त्यांना ५ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयातील मनोविकृती शास्त्र विभागाअंतर्गत त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यासोबत नातेवाईक रुग्णालयात होते. आज सकाळी त्यांनी नातेवाईकांनी आणलेला चहा घेतला. यानंतरही काही वेळाने ते शौचास जातो असे सांगून ते टॉयलेटमध्ये गेले. यावेळी दाराची कडी आतून लावून घेतली नाही. यावेळी त्यांनी तेथील एक्झॉस्ट पंख्याला गळ्यातील रुमालाच्या साहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने दुसऱ्या एका रुग्णाने टॉयलेटमध्ये जाण्यासाठी टॉयलेटचे दार लोटले असता रामेश्वर यांनी गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. यामुळे त्यांनी आरडाओरड केल्याने डाॅक्टर, नर्स, सफाई कर्मचारी आणि नातेवाईक यांनी तिकडे धाव घेतली. त्यांच्या गळ्यातील फासाचा रुमाल सोडून अपघात विभागात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा आबुज यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिस हवालदार पठाण तपास करीत आहेत.