गुरूजींचा कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन मला सगळ्यात जास्त भावतो. शास्त्रीय संगीतात थेअरीला खूप महत्त्व दिले जाते. पण गुरूजींनी कलेला महत्त्व दिले आणि कलेसाठी शास्त्र असते, असे संस्कार आमच्यावर केले. मैफलीत भाव, आनंद, चैतन्य हवे, असा त्यांचा नेहमीच आग्रह असायचा. त्यांच्याकडून नेहमी रंगलेलं गाणंच ऐकायला मिळायचे. मग ती मैफल छोट्या हॉलमधील असो किंवा भव्य सभागृहातली असाे, ती विलक्षणच असायची. कला गुरूजींनी जपली आणि आमच्यातही रूजविली. या वयातही ते रोज रियाज करायचे. त्यांच्या जाण्याने कलापीठ हरविले आहे.
- गायक सचिन नेवपूरकर
------------
२. मैफल जिंकण्याचे अफाट कौशल्य
तब्बल १३ वर्षे मी गुरूजींसोबत रात्रंदिवस राहिलो. गुरूकुल पद्धतीनेच त्यांच्याकडे माझे सगळे शिक्षण झाले. शास्त्रीय शुद्ध संगीताचे मराठवाड्यातले एक मोठे पर्व गुरूजींच्या जाण्याने संपले आहे. संगीत नाटकातही गुरूजींनी मोठे योगदान दिले आहे. गानमहर्षी अण्णासाहेब यांच्या कडक शिस्तीत ते तयार झाले होते. अण्णासाहेबांच्या शिकवणीबाहेर ते कधीच गेले नाहीत. गुरूजींमध्ये मैफल जिंकण्याचे अफाट कौशल्य होते. आज काय सादर करायचे, हे श्रोत्यांच्या डोळ्यात बघून ते अनेकदा ठरवायचे. फार ठरवून ते मैफलीत कधीच गायले नाहीत.
- गायक विश्वनाथ दाशरथे