छत्रपती संभाजीनगर : देश गुलामीत होता. त्या कठीण परिस्थितीत ज्या शूरवीरांनी आपली भारतमाता गुलामीतून मुक्त करण्यासाठी मोठा लढा दिला, त्यात सर्वाधिक योगदान मराठा समाजाचे होते. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी बागेश्वर पीठाची मागणी आहे, अशा शब्दात पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मराठा आंदोलनास पाठिंबा दिला.
पत्रपरिषदेत याची घोषणा खुद्द पं. धीरेंद्र शास्त्री यांनी केली. सरकारला आवाहन करतो की, त्यांनी चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असे ते म्हणाले.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान तुम्ही स्वीकारत नाही असा आरोप होत आहे, असे विचारले असता पं. धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितले की, कोणतेही प्रश्न, वादविवाद हे मीडियात बोलून सुटत नाहीत. तुमचे कुठे दुखत असेल तर तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागते. माझ्याबाबतीत तुम्हाला काही चुकीचे वाटत असले तर तुम्ही मीडियात प्रश्न न मांडता माझ्याकडे या, हेच मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगत आहे.
मी नागपुरात आलो, मुंबईत आलो; पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी संवाद साधला नाही. मी छत्रपती संभाजीनगरात त्यांना आवाहन करतो, येथे तीन दिवस आहे. काही तुम्हाला खटकत असेल तर तुम्ही माझ्याशी चर्चा करायला या. या पत्रपरिषदेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व निमंत्रक डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, शिरीष बोराळकर, संजय केणेकर आदींची उपस्थिती होती.