- कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषदपु. ल. देशपांडे यांच्यानंतर महाराष्ट्रानं ना. धो. महानोर यांच्यावर अतोनात प्रेम केलं. देशाच्या कानाकोपऱ्यातील मराठीजनांनी त्यांच्या कवितांचे कार्यक्रम आयोजित केले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांनी कवितांचे वाचन केले. गावखेड्यातील एका व्यक्तीला सर्वच स्तरातून एवढं प्रेम मिळणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. हे प्रेम महानोरांच्या वाट्याला आले.
ना. धो. महानोर यांनी १९६०-७० च्या दशकात कविता लिहिण्यास सुरुवात केली. त्यांच्या पहिल्या ८ कविता मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठानमध्ये ‘रानातल्या कविता’ नावाने प्रकाशित झाल्या. याच नावाने पुढे १९६७ ला त्यांचा पहिला कविता संग्रह आला अन् महानोर मराठी साहित्यात सर्वदूर पोहोचले. १९६०-७० हे दशक मराठी साहित्यातील कवितांचे सुवर्णयुग होते. या दशकात दिलीप चित्रे, अरुण कोलठकर, नारायण सुर्वे, आरती प्रभू, ग्रेस, केशव मेश्राम, नामदेव ढसाळ, मधुकर कोचे आणि ना. धो. महानोर हे महत्त्वाचे कवी. गझलकार सुरेश भटही याच दशकातले. पुढे हेच कवी गाजत राहिले. या सर्वांमधील ना. धो. एकमेव हयात होते. त्यांचीही आता प्राणज्योत मालवली. ही मराठी साहित्याची सर्वात मोठी हानी आहे.
महानोर यांचे इंदूर, बडोदा, हैदराबाद, धारवाड, बंगळुरू, दिल्ली आदी ठिकाणी कविता वाचन व्हायचे. दिल्लीतील कार्यक्रमांना तत्कालीन सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड, केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण, ना. वि. गाडगीळ, वसंतराव साठे, पंजाबराव देशमुख यांच्यासह इतरही रसिकांची उपस्थिती असायची. पु. ल. देशपांडे यांच्यासारखे प्रेम महाराष्ट्राने ना. धो.वर केले.
महानोर १९८४ साली अंबाजोगाई येथील साहित्य संमेलनानंतर ‘मसाप’चे अध्यक्ष झाले. एका विशिष्ट परिस्थितीत त्यांना हे अध्यक्षपद स्वीकारावे लागले. त्यानंतर महामंडळाचेही अध्यक्ष झाले. ‘मसाप’ कोणत्याही प्रकारचे वाङ्मयीन पुरस्कार देत नव्हती. तेव्हा त्यांनी नरहर कुरुंदकर यांच्या नावाने मराठवाड्यातील साहित्यिकांना पुरस्कार देण्यास सुरुवात केली. पहिला पुरस्कार व्यासंगी पत्रकार अनंत भालेराव व कवयित्री अनुराधा पाटील यांना पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते देण्यात आला. त्यानंतर ‘मसाप’तील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बांधण्याचा निर्णयही महानोर यांच्याच कार्यकारिणीने घेतला. एकूणच महानोर यांच्या जाण्याने मराठी साहित्य, मराठवाडा साहित्य परिषदेचे अतोनात नुकसान झाले. मसाप व माझ्या कुटुंबीयांतर्फे त्यांना श्रद्धांजली !