इंदिरा गांधींनी विमानतळावर दिली उमेदवारी; नवख्या अशोक डोणगावकरांनी मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 04:23 PM2024-10-24T16:23:47+5:302024-10-24T16:24:57+5:30
आठवणीतील निवडणूक १९८०: पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विमानतळावर जाहीर केलेला उमेदवार बदलून नवख्या अशोक पाटील डोणगावकर यांना उमेदवारी दिली.
- जयेश निरपळ
गंगापूर : विधानसभेची १९८०मध्ये झालेली निवडणूक गंगापूरकरांच्या कायम लक्षात राहील, अशी होती. तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी औरंगाबाद विमानतळावर आपला जाहीर केलेला उमेदवार बदलून नवख्या अशोक पाटील डोणगावकर यांना उमेदवारी दिली आणि डोणगावकर हे एस. काँग्रेसचे विद्यमान आमदार ॲड. लक्ष्मणराव मनाळ यांचा पराभव करून वयाच्या ३७व्या वर्षी आमदार झाले.
वाहेगावचे ॲड. लक्ष्मणराव मनाळ दादा व डोणगावचे अशोक पाटील डोणगावकर दादा या दोन ‘दादां’मध्ये १९८० मध्ये झालेली विधानसभा निवडणूक लक्षवेधी आणि तेवढीच रंजक झाली होती. या निवडणुकीत एस. काँग्रेसच्या वतीने विद्यमान आमदार ॲड. लक्ष्मणराव मनाळ मैदानात होते, तर इंदिरा काँग्रेसच्या वतीने हर्सूल सावंगीचे (लासूर स्टे.) तत्कालीन सरपंच डॉ. बाबुराव पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. याच दरम्यान देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी प्रचारासाठी औरंगाबाद विमानतळावरून इतरत्र रवाना होताना जालन्याचे तत्कालीन खासदार बाळासाहेब पवार यांनी इंदिरा गांधी यांच्याकडे गंगापूरची उमेदवारी बदलण्याची मागणी केली व अशोक पाटील डोणगावकर यांच्या नावाची शिफारस केली. गांधी यांनी पक्षाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षा प्रेमलाकाकी चव्हाण (माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई) यांना सांगून उमेदवारी त्वरित बदलली आणि यानंतर प्रत्यक्ष झालेल्या निवडणुकीत अशोक पाटील डोणगावकर यांनी पक्षश्रेष्ठींसह वरिष्ठ आणि इंदिरा गांधी यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून विद्यमान आमदार ॲड. मनाळ यांचा ७ हजार ८५ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत डोणगावकर यांना २३ हजार १२६, तर मनाळ यांना १६ हजार ४१ एवढी मते मिळाली तसेच सीपीआयचे जोरावर जल्लूमामू यांना ६ हजार ६४४ आणि अपक्ष पारसकुमार ठोळे यांना ७ हजार ३८३ मते मिळाली होती.
पहिल्यांदाच राजकारणात प्रवेश
या निवडणुकीच्या माध्यमातून डोणगावकर घराण्याचा पहिल्यांदाच राजकारणात प्रवेश झाल्याने डोणगावकर घराण्यासाठी ही निवडणूक संस्मरणीय ठरली. यानंतर १९८४ साली औरंगाबाद लोकसभेच्या निवडणुकीत अशोक डोणगावकर यांचे नातू साहेबराव पाटील डोणगावकर हे खासदार झाले होते. १९९५च्या विधानसभा निवडणुकीत अशोक पाटील डोणगावकर हे अपक्ष निवडून येत दुसऱ्यांदा आमदार, तर पहिल्यांदाच मंत्री झाले होते. त्यांच्या रुपाने मतदारसंघाला आतापर्यंत केवळ एकदाच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.