लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नूतन आधार नोंदणी करायची असेल तर महा ई-सेवा केंद्रामार्फत सुरू असलेल्या केंद्रांवर १०० ते २०० रुपये अनधिकृत घेतले जात आहेत. एकीकडे प्रशासन मोफत सुविधा देत असताना केंद्र चालक मनमानी कारभार चालवून सर्वसामान्यांची आर्थिक लूट करीत असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमधून चव्हाट्यावर आला. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.शासनाने प्रत्येकाला आधार कार्ड असणे बंधनकारक केले आहे. आजही जिल्ह्यात अनेकांकडे आधार कार्ड नाही, त्यामुळे त्यांना विविध योजनांचा लाभ घेता येत नाही, तसेच अनेक ठिकाणी अडचणींना तोंड द्यावे लागते. दिवसेंदिवस हा त्रास वाढत चालल्याने नागरिक आधार कार्ड काढण्यासाठी पुढे येत आहेत.सर्वसामान्यांना आधार नोंदणी ही मोफत असल्याचा गवगवा प्रशासन करीत आहेत; परंतु त्यांच्या अधिपत्याखाली असणाºया महा ई-सेवा केंद्रामार्फत चालणारी केंद्रे सर्रासपणे सर्वसामान्यांकडून १०० ते २०० रुपये घेऊन आर्थिक लूट करू लागले आहेत. याबाबत अनेक वेळ महा आॅनलाईन व जिल्हा प्रशासनकडे तक्रारी करण्यात आल्या; परंतु त्यांनी याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केले, असा आरोप केला जात आहे.जिल्ह्यात सुरु असलेल्या सर्वच आधार केंद्रांची तपासणी करुन सर्वसामान्यांची लूट करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
‘आधार’साठी सर्वसामान्यांची लूट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 12:39 AM