औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार्किंग शुल्काच्या नावाखाली प्रवासी आणि वाहनधारकांची अक्षरश: लूट केली जात आहे. विमानतळावर पिकअप आणि ड्रॉपसाठी ५ मिनिटांपर्यंत पार्किंग मोफत आहे. ही मोफत सुविधा टाळण्यासाठी शुल्क वसुलीची जुनी कॅबिन बंद करून थेट आऊट गेटजवळ नवीन कॅबिन करण्यात आली.कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराचा आर्थिक आणि मानसिक फटका दररोज अनेक प्रवासी, वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.
विमानतळावर प्रवेश केल्यानंतर पाच मिनिटांत प्रवाशांची ने-आण (पिकअप आणि ड्रॉप) करून बाहेर पडल्यास कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. यासंदर्भात प्रवेशद्वाराजवळ फलकदेखील लावलेला आहे. यापूर्वी पार्किंग शुल्कासाठी आऊट गेटवरील मार्गात कॅबिन होती. ही कॅबिन पाच मिनिटांत विमानतळाच्या बाहेर पडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत होती. यामुळे पार्किंगमध्ये वाहन उभे न करता केवळ प्रवाशांची ने-आण करणाऱ्या वाहनधारकांना कोणतेही शुल्क द्यावे लागत नव्हते. परंतु तीन महिन्यांपूर्वी पार्किंग नवीन कंत्राटदारांकडे आले. तेव्हापासून पार्किंगचालक आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या मनमानी आणि उद्धट वागणुकीला सुरवात झाली. प्रत्येकाकडून पार्किंग शुल्काची वसुली करण्यासाठी शक्कल लढवून आऊट गेटवरील जुनी कॅबिन बंद करण्यात आली. जुन्या कॅबिनच्या कितीतरी पुढे नवीन कॅबिन बनविली. या नव्या कॅबिनमधून बाहेर पडणाऱ्या वाहनधारकांकडून शुल्क वसुली सुरू करण्यात आली.
नव्या कॅबिनमुळे वाहन विमानतळावर प्रवेश केल्यापासून तर बाहेर पडेपर्यंतची नोंद होण्याचे अंतर वाढले आहे. त्यात भर म्हणून पार्किंगमधील कर्मचारी सर्वात प्रथम बाहेर पडण्यासाठी येणाऱ्या वाहनधारकांबरोबर शाब्दिक वाद घालतात. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागतात. परिणामी पाच मिनिटांत बाहेर पडू इच्छिणाऱ्या वाहनधारकांना ताटकळावे लागते. यासंदर्भात वाहनधारकांनी, प्रवाशांनी तक्रारी केल्या आहेत. ट्विटरवर अनेकांनी हा प्रकार मांडला. विमानतळ प्राधिकरणाकडून पार्किंगचालकास सूचना करण्यात आली. परंतु वर्तणुकीत कोणतीही सुधारणा झाली नाही.
पहाटेच्या प्रवाशांना मनस्तापपार्किंगचालकाच्या वागणुकीचा पहाटेच्या वेळी ये-जा करणाऱ्या प्रवासी आणि त्यांच्या नातेवाईकांना सर्वाधिक फटका बसत आहे. जुनी कॅबिन बंद केल्याने अंतर वाढले आहे. पाच मिनिटांत बाहेर पडत असतानाही बळजबरीने पार्किंग शुल्काची मागणी केली जाते. दोन दिवसांपूर्वीच एका वाहनधारकास याचा मनस्ताप सहन करावा लागला. यासंदर्भात अधिकाऱ्यांनाही कल्पना दिली आहे. प्रवाशांबरोबर असभ्य वर्तणूक वाढल्याने पार्किंगचालकाचे कंत्राट रद्द केले पाहिजे.- जसवंतसिंग, अध्यक्ष , टुरिझम प्रमोटर्स गिल्ड