उस्मानाबाद : शहरातील मध्यवर्ती शिवाजी चौकात असलेले एक किराणा दुकान फोडून चोरट्यांनी आतील सामान व रोख रक्कम असा जवळपास ३९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला़ ही घटना गुरूवारी पहाटे घडली. या प्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद शहरातील कोट गल्ली भागातील रहिवाशी अमोल महादेव देवगुडे यांचे शिवाजी चौकात किराणा दुकान आहे़ अमोल देवगुडे व त्यांच्या दुकानातील कामगार बुधवारी काम झाल्यानंतर दुकानाला कुलूप लावून घरी गेले होते़ सकाळी दुकाना शेजारी राहणाऱ्या नागरिकांना दुकानाचे शटर उघडे दिसल्यानंतर त्यांनी अमोल देवगुडे यांना चोरी झाल्याची माहिती दिली़ देवगुडे यांनी दुकानाकडे धाव घेवून पोलिसांना माहिती दिली़ घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर आतील घटनेचा पंचनामा करण्यात आला़ यावेळी चोरट्यांनी दुकानातील काजूपात्रीचा दहा किलोचा सिलबंद डबा, पेंड खजुरचे दहा किलोचे दोन बॉक्स, १५ लिटरचे चार तेलाचे डबे, दहा बॉडी स्प्रे, ४ किलोचा पनीरचा एक बॉक्स, रोख २० हजार रूपये असा एकूण ३९ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ याबाबत अमोल देवगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
भरचौकातील दुकान फोडले
By admin | Published: July 22, 2016 12:26 AM