पैठण : पैठण-औरंगाबाद रस्त्यावर दरोडा टाकणाऱ्या पल्सर गँगच्या मुसक्या पैठण पोलिसांनी आवळल्या आहेत. या गँगच्या दोघांना मुद्देमालासह पोलिसांनी गजाआड केले. गेल्या दोन वर्षांपासून पैठण- औरंगाबाद रस्त्यावर या गँगने धुमाकूळ घालत अनेकांना लुटल्याने मोठी दहशत निर्माण झाली होती. पल्सर गँगच्या उर्वरीत आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल तसेच या गँगकडून अनेक गुन्हे उघडकीस येतील अशी अपेक्षा पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी व्यक्त केली आहे.
नितीन गुलाब घटे ( रा. नारळा, पैठण ) व नामदेव ज्ञानदेव बोंद्रे ( रा . वरूडी ता. पैठण ) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. या दोघांनी आपल्या दोन साथीदारासह दि. २० जानेवारी रोजी मध्यरात्री ट्रॅक्टरने संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यास ऊस घेऊन जात असताना चालक बाळासाहेब ढेंबरे ( रा. तळनेवाडी , ता.गेवराई , जि.बीड ) यास पैठण- औरंगाबाद रोडवर महानंद दूध शीतकरण केंद्राजवळ अडवून जबर मारहाण करीत रोख रक्कम व मोबाईल फोन काढून घेतला. यानंतर गंभीर जखमी चालकास बाजूच्या शेतात नेऊन टाकत दोन्ही ट्रॉली काढून टाकत ट्रॅक्टर ( क्रमांक एम.एच. २३ ए.एस २८८२ ) हेड पळवून नेले होते. या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी केलेल्या तपासात पळवून नेलेले ट्रॅक्टर पैठण शहरातच असल्याचे आढळून आले. पोलिसांनी नितीन गुलाब घटे याच्याकडून ट्रॅक्टर जप्त केले. गुन्हा करताना वापरलेली विनाक्रमांकाची पल्सर मोटारसायकल त्याचा साथीदार नामदेव ज्ञानदेव बोंद्रे ( रा. वरूडी ता. पैठण ) याच्याकडून जप्त करण्यात आली. दोघांनाही अटक करून पैठण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, सी. जी गीरासे, पोलीस नाईक गोपाल पाटील, योगेश केदार, महिला पोलीस कॉ. सविता सोनार यांनी ही कारवाई केली.
पल्सर गँगची दहशतपैठण शहर व परिसरात काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवर आलेल्या चोरट्यांनी व्यापारी, पेट्रोलपंप मालक यांच्या हातातून रोख रक्कम तर महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावून पोबारा केला आहे. विशेष म्हणजे, या टोळीने रात्री अनेकांना लुटले आहे. यात अनेक तक्रारी दाखल आहेत. यामुळे गँगची मोठी दहशत निर्माण झाली होती. पोलिसांनी गँगमधील दोघांना अटक केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.