औरंगाबाद : औरंगाबाद - अहमदनगर या १२० किलोमीटर अंतराच्या नव्या रेल्वेे मार्गाच्या फिल्ड सर्वेक्षणाला सोमवारी सुरुवात झाली. यासाठी मध्य रेल्वेचे पथक शहरात दाखल झाले. या रेल्वे मार्गामुळे थेट पुण्याला कनेक्टिव्हिटी मिळणे शक्य होणार असल्याचे पथकाने स्पष्ट केले. हा मार्ग अधिक सोयीचा, फायदेशीर असल्याचे म्हटले जात आहे. पण, २२ किलोमीटरच्या राेटेगाव - कोपरगाव मार्गानेही पुणे कनेक्टिव्हिटी मिळणे शक्य आहे. परंतु या नव्या मार्गामुळे रोटेगाव - कोपरगाव मार्गाला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
मध्य रेल्वेचे डेप्युटी चीफ ऑपरेशन मॅनेजर (सर्वे) सुरेशचंद्र जैन, चीफ ट्राफीक इन्स्पेक्टर (सर्वे) रविप्रकाश गुजराल आणि मुकेशलाल यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे औरंगाबाद - नगर या मार्गाच्या दृष्टीने उद्योजकांशी चर्चा केली. यावेळी खा. डाॅ. भागवत कराड, औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रीतेश चॅटर्जी, उद्योजक मुकुंद कुलकर्णी, राम भोगले, कमलेश धूत, ‘सीआयआय’चे रमण अजगावकर, रवींद्र वैद्य आदींची उपस्थिती होती. यावेळी या पथकाने औरंगाबादहून किती मालवाहतूक होते आणि औरंगाबाद - नगर मार्ग झाल्यास किती मालवाहतूक शक्य होईल, यादृष्टीने चर्चा केली. यावेळी उद्योजकांनी त्यासंदर्भात माहिती देत हा मार्ग झाल्यास मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होईल, असे सांगितले.
या प्रस्तावित मार्गात साजापूर, गंगापूर, देवगड, नेवासा, शनिशिंगणापूर येथे स्थानक करणे प्रस्तावित आहे. साजापूर येथे कंटेनर डेपो केल्यास अधिक फायदा होईल, असे उद्योजकांनी म्हटले. हे पथक ४ तारखेपर्यंत या सर्व ठिकाणी भेटी देऊन आढावा घेणार आहे. नगर - दौंड - पुणे या अशा मार्गाने पूर्वी पुण्याला जावे लागत होते. परंतु आता कॅडलाइन टाकून नगरहून पुण्याला जाणे शक्य झाले आहे. त्यामुळे औरंगाबाद - नगर मार्गामुळे पुण्याची कनेक्टिव्हिटी मिळेल. सर्वेक्षणाचा अहवाल तीन महिन्यांत तयार होईल. त्यानंतर तो प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे जाईल, असे सुरेशचंद्र जैन यांनी सांगितले.
नव्या मार्गाला विरोध नाहीऔरंगाबाद रेल्वेमार्ग पुणे, गोवा मार्गाला जोडण्यासाठी रोटेगाव ते कोपरगाव या रेल्वे मार्गाची जवळपास २५ वर्षांपासून प्रतीक्षा केली जात आहे. केवळ २२ किलोमीटरचा हा मार्ग आहे. या मार्गाचे सर्वेक्षण झाले आहे. त्याचा डीपीआरही तयार झालेला आहे. त्यामुळे हा मार्ग निश्चितच होईल. आता औरंगाबाद - नगर मार्गाचे सर्वेक्षण केले जात आहे. पण, औरंगाबाद - नगर मार्गाला आमचा विरोध नाही. तोही व्हावा.- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती