छत्रपती संभाजीनगर : पुण्यात रविवारी मध्यरात्री आलिशान कारने दोन अभियंत्यांना चिरडून जीवे ठार मारले. यातील अल्पवयीन चालकाचा वडील विशाल सुरेंद्र अग्रवाल (५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी, पुणे) हा अटकेच्या भीतीने छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊन लपला होता. शहर गुन्हे शाखेने मंगळवारी पहाटे ४ वाजता त्याला हॉटेलमधून ताब्यात घेत पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले.
शनिवारी सुटीमुळे रात्री पार्टीकरून मध्यप्रदेशचे अभियंते अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा हे घरी परतत होते. याच वेळी अग्रवालचा १७ वर्षीय मुलगा एका बड्या पबमधून पार्टीकरून आलिशान कारमधून सुसाट निघाला होता. कल्याणीनगरमध्ये वर्दळ असताना देखील त्याने वेग कमी न करता सुसाट कार दामटत अनिश व अश्विनी यांच्या दुचाकीला उडवले. या भीषण अपघातात दोघांचा ही जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी धाव घेत चालकाला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, सोमवारी चालकाला तत्काळ जामीन मिळाल्याने पुणे पोलिसांवर चहूबाजूने टीका सुरू झाली होती. राजकीय टीका सुरू झाल्याने गुन्ह्यात आवश्यक कलमांमध्ये वाढ करून चालकाचे वडील विशाल अग्रवाल यास अटक करण्याचे ठरविण्यात आले. येरवडा पोलिस तेव्हापासून त्याचा सर्वत्र शोध घेत होते. मात्र, अटकेची चाहूल लागल्याने विशाल अग्रवालने पुणे सोडले. मंगळवारी रात्री तो छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असल्याची माहिती प्राप्त झाली होती. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी छत्रपती संभाजीनगर आयुक्त मनोज लोहिया पोलिसांना संपर्क करून याबाबत कळवले.
लोहिया यांनी तत्काळ गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरुमे यांना शोध घेण्यासाठी सूचना केल्या. उपनिरीक्षक प्रवीण वाघ, अंमलदार संजय नंद, जितेंद्र ठाकूर, परभत म्हस्के, मनोहर गीते, विजय भानुसे यांनी पहाटे ३ वाजता अग्रवालचा चालक चत्रभूज बाबासाहेब डोळस (३४) व सहकारी राकेश भास्कर पौडवाल (५१) यांना नारळी बागेच्या हॉटेलमधून शोधून काढले. त्यानंतर अग्रवाल यास आरटीओ ऑफिसजवळील एका हॉटेलमधून ताब्यात घेत पोलीस आयुक्तालयात नेण्यात आले. सकाळी सहा वाजता येरवडा पोलिसांनी अग्रवालला ताब्यात घेत पुण्याला रवाना झाले.