खुलताबाद: जगप्रसिद्ध वेरूळ येथील १२ वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिरास पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आज गुरुवारी (दि.३०) दुपारी भेट दिली. यावेळी अभिषेक, पुजा करीत त्यांनी दुपारची आरती देखील केली. तसेच मंदिर समितीचे आभार मानत राज्यपाल पुरोहित यांनी दर्शन घेऊन मन प्रसन्न झाल्याचा अभिप्राय पुस्तिकेत नोंदवला.
पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हे आज शिर्डीहून वेरूळला घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी आले. यावेळी घृष्णेश्वर मंदिर देवस्थानाच्यावतीने राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचे देवस्थानचे अध्यक्ष सुनील जोशी, कार्यकारी विश्वस्त योगेश विटखेडे, चंद्रशेखर शेवाळे देवस्थानाचे व्यवस्थापक संजय जोशी, रवींद्र पुराणिक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या वतीने राजेश वाकलेकर यांनी स्वागत केले.
पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित मंदिर परिसरात येणार असल्याने पोलीस उपअधीक्षक विजय पाटील ,उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड,पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, नायब तहसीलदार प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.