केळगाव : सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे मिरची खरेदीला सुरुवात झाली आहे. २८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. उन्हाळ्याच्या प्रतिकूल परिस्थितीत मिरची जगवली. मात्र, तिला चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.
परिसरातील आमठाणा, घाटनांद्रा, धावडा, केळगाव, कन्नड तालुक्यातील चिंचोली, करंजखेडा या भागात एप्रिल महिन्यात मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आता ही मिरची निघायला सुरुवात आहे. सिल्लोड तालुक्यातील नावाजलेली मिरचीची बाजारपेठ म्हणून आमठाणा परिचित आहे. येथे स्थानिक व्यापाऱ्यांसह दिल्ली, मुंबई, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथूनही व्यापारी मिरची खरेदीसाठी येतात. मात्र, यंदा कोरोना स्थितीमुळे सदर व्यापारी येण्याची शक्यता धूसर आहे. मिरची आवक सुरु झाल्यामुळे स्थानिक व्यापारी राजू सुसर, गजानन देशमुख, बी. के. मोरे, सचिन चौधरी या मिरची व्यापाऱ्यांनी काटा सुरू केला आहे. सुरुवातीलाच मिरचीला प्रतिक्विंटल २८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. गतवर्षी सुरुवातीलाच सहा हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता.
कोट
कोरोनाच्या परिस्थितीमुळे परराज्यातील व्यापारी मिरची खरेदीला येत नसल्याने मिरचीचे दर कमी आहेत. येणाऱ्या काळात परिस्थिती सर्वसामान्य झाली, तर भाव वाढतील.
बाळासाहेब ईवरे, मिरची व्यापारी, आमठाणा
कोट
गतवर्षी चांगला दर मिळाल्याने शेतकरी खूश होते. यंदा मिरचीवर थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव असून, शेतकऱ्यांना महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. यामुळे शेतकरी वैतागले आहेत. त्यात भाव चांगला मिळाला नाही, तर नाराजी होते.
जी. पी. सुरडकर, कृषी सहाय्यक, केळगाव
फोटो : आमठाणा येथील मिरची बाजार सुरू झाला असून, काट्याचे पूजन करताना मान्यवर.
180621\img-20210618-wa0218_1.jpg
आमठाणा येथील मिरची बाजार सुरु झाला असून काट्याचे पूजन करताना मान्यवर.