औरंगाबाद : घाटी रुग्णालयास वर्षभरापासून एमआरआय आणि सिटी स्कॅन यंत्र मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. ‘हाफकिन’कडून केवळ यंत्रांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली जात होती. परंतु यंत्रांबरोबर आवश्यक बांधकाम करणे गरजेचे होते. त्यामुळे आता बांधकामाचा समावेश राहणाऱ्या ‘टर्न की’ प्रकल्पाद्वारे यंत्रांची खरेदी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी शुक्रवारी घाटीत पाहणी केली. यावेळी ‘टर्न की’ प्रकल्पाविषयी माहिती दिली. घाटी रुग्णालयास वर्षभरापूर्वी शिर्डी संस्थान पावले असून, यंत्राच्या खरेदीसाठी १५ कोटींचा निधी देण्यात आला आहे. ‘डीपीसी’च्या माध्यमातूनही यंत्रासाठी सात कोटींचा निधी मिळाला. हा निधी हाफकिन मंडळाला देण्यात आला. परंतु अद्यापही यंत्रे घाटीत दाखल झालेली नाहीत. यावेळी डॉ. लहाने म्हणाले, ‘हाफकिन’कडे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मागण्या आहेत. त्यांच्याकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. लवकरच यंत्रे प्राप्त होतील. बांधकामासह यंत्रांची खरेदी प्रक्रिया व्हावी, यासंदर्भात नुकतीच बैठक घेतली. त्यात ‘हाफकिन’ मंडळाने तसे करण्याचे मान्य केले आहे.