छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागात जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व ५७५९ पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी सुरू करण्यात आली असून आतापर्यंत २०८३ पाणी नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये दूषित पाणी मिसळल्यास साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ही शक्यता लक्षात घेऊन वेळीच त्यावर उपाययोजना करता येतील, या हेतूने राज्य शासनाच्या निर्देशानुसार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली. यासाठी सर्व ‘बीडीओं’ना सूचना दिल्या आहेत. ७ जूनपासून जिल्ह्यातील ही मोहीम सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील ८७० जलसुरक्षकांमार्फत पाण्याची रासायनिक तपासणी पूर्ण केली जाणार आहे. सुरुवातीला २० जूनपर्यंत ही मोहीम राबविण्याचे निर्देश होते. आता ३० जूनपर्यंत ही तपासणी केली जाणार आहे.
तथापि, आतापर्यंत गावातील पाणीपुरवठा योजनांचे स्रोत, शाळा, अंगणवाडी व वैयक्तिक नळजोडणी असलेली कुटुंबे आदी स्रोतांचे २०८३ पाणी नमुने रासायनिक तपासणीसाठी जलसुरक्षकामार्फत गोळा करण्यात आले असून हे नमुने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर जमा करण्यात आले. तेथे पाणी गुणवत्ता पोर्टलवर नोंद करून हे नमुने जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, पाचोड आणि सिल्लोड उपविभागीय प्रयोगशाळेत जमा करण्यात आले आहेत. पाणी गुणवत्ता तपासणी मोहिमेत विस्तार अधिकारी ग्रामपंचायत व विस्तार अधिकारी आरोग्य हे संनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
शुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रयत्नजिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या ५७५९ स्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी करून त्याच्या नोंदी केंद्र शासनाच्या पोर्टलवर करणे आवश्यक आहे. ही मोहीम युद्धपातळीवर सुरू असून ३० जूनपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. याद्वारे पाण्यातील पीएच, टर्बिडीटी, लोह, क्लोराईड, मॅग्नेशियम फ्लोराईड आदीचे प्रमाण समजून येईल. त्यानंतर सदरील दूषित स्रोतांसाठी शुद्धीकरण मोहीम हाती घेणे सोपे जाईल. ज्यामुळे नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल.- राजेंद्र देसले, प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन