औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रवींद्र गुप्ता यांनी सोमवारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनला भेट देऊन विविध सोयी-सुविधांची मॅरेथॉन पाहणी केली. या पाहणीत विविध कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच झापले. तसेच अन्नपदार्थांच्या नियोजनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कँटीन, फूड प्लाझाचालक आणि आरक्षण कार्यालयात दर फलक लावण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारासही दंड लावला. विशेष म्हणजे पुरी-भाजीसोबत योग्य प्रमाणात लोणचे नसल्याने कँटीनचालकास दंड लावण्यात आला.महाव्यवस्थापकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा रेल्वेस्टेशनला भेट देऊन गुप्ता यांनी रेल्वेस्टेशनची नवीन इमारत, जुनी इमारती, आरक्षण कार्यालय, पार्सल विभाग, कर्मी दल बुकिंग लॉबीसह विविध सोयी-सुविधांची पाहणी केली. यावेळी नांदेड विभागाचे व्यवस्थापक ए. के. सिन्हा यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आरक्षण कार्यालयात एसी नसल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे याठिकाणी तात्काळ एक्झास्ट फॅन लावण्याची सूचना त्यांनी केली. याठिकाणी तिकिटाचे दरफलक न लावणाऱ्या ठेकेदारास दंड लावण्याची सूचना त्यांनी केली. फूड प्लाझामधील पाहणीच्या वेळी ‘जनता खाना’ उपलब्ध नसल्याने दंड लावण्याचीही त्यांनी सूचना केली.पार्किंगसाठी नियोजित जागेशिवाय अन्य जागेचा वापर होत असल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. हा प्रकार तात्काळ बंद करण्याची सूचना केली. जुन्या इमारतीमधील रिकाम्या जागा करारावर देण्यासही त्यांनी सांगितले. स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या जुनाट यंत्रांविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. रेल्वेस्टेशनवरील नळातील पाणी थंड आहे का, याची पाहणी करण्यासाठी त्यांनी अन्य अधिकाऱ्यांच्या हातातील पाणी घेतल्याने सर्वसामान्य प्रवाशांनी मात्र नाराजी व्यक्त केली.
पुरी-भाजीसोबत लोणचे नसल्याने दंड
By admin | Published: March 15, 2016 12:38 AM