वाळूज महानगर : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातून तरुणांचे लोंढे रोजगाराच्या शोधात वाळूजसह परिसरात दाखल होत आहेत. औद्योगिक वसाहत परिसरातील अनेक कंपन्यांच्या गेटसमोर रांगा लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
राज्याच्या बहुतांश भागात यंदा अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. मराठवाडा तर दुष्काळाने अधिकच होरपळत आहे. त्यातच शासनाने काही अपवाद वगळता सरकारी नोकर भरती बंद केली आहे. त्यामुळे बेरोजगार सुशिक्षितांचे प्रमाण वाढले आहे.
दुष्काळामुळे ग्रामीण भागातील रोजगारही हिरावला गेला आहे. रोजगार हमी योजनेची कामेही बहुतांशी बंद आहेत. तर काही ठिकाणी सुरु असलेली काम यंत्राच्या सहाय्याने केली जात असल्याने ग्रामस्थांना काम मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे ग्रामणी भागातील तरुण कामाच्या शोधात शहराकडे स्थलांतर करीत आहेत. रोजगाराची संधी कारखान्यांत असल्याने बहुतांश तरुण येथे येत आहेत.
वाळूज औद्योगिक क्षेत्रात संपूर्ण मराठवाड्यातील तरुण-तरुणींचे लोंढे येत आहेत. येथील जोगेश्वरी, रांजणगाव, वाळूज, घाणेगाव, विटावा, वडगाव, पंढरपूर भागातही तरुण रोजगार शोधाताना दिसून येत आहेत. परिसरातील विविध कारखान्यांच्या गेटवर रोजगारासाठी तरुणांच्या रांगा लागत असून, खाजगी ठेकेदाराकडेही काम मिळविण्यासाठी तरुणांची गर्दी होत आहे.
दिवसभर फिरुनही काम मिळेनाशासनाच्या धोरणामुळे अनेक छोटे उद्योेग बंद पडले आहेत. दुष्काळाचाही फटका कारखानदाराला बसला आहे. शिवाय प्रशासनाच्या पाणी कपातीच्या धोरणामुळे कारखान्याच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे. व्यवसाय तोट्यात जात असल्याने उद्योजकांनी कामगार कपात करुन मोजक्याच कामगारांकडून उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे या कारखान्यांत काम मिळणे अवघड झाले आहे. कारखान्यात कोणी ओळखीचे असेल तरच काम मिळत आहे. अन्यथा अनेक तरुण-तरुणींना उपाशीपोटी दिवसभर वणवण फिरुनही काम मिळत नसल्याचे चित्र आहे.