पुरुषोत्तम भापकरही लढवू शकतात काँग्रेसतर्फे लोकसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 05:42 PM2018-10-30T17:42:29+5:302018-10-30T17:44:11+5:30
अशी शक्यता वर्तवली आहे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी!
औरंगाबाद : ‘विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकरही लढवू शकतात काँग्रेसतर्फेऔरंगाबादची लोकसभा निवडणूक’, अशी शक्यता वर्तवली आहे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी!
त्यांनी सांगितले की, औरंगाबादची लोकसभा निवडणूक काँग्रेसतर्फे लढविण्यासाठी सात उमेदवार इच्छुक आहेत. त्यात डॉ. पुरुषोत्तम भापकर व डॉ. कल्याण काळे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. यावेळची औरंगाबाद लोकसभेची जागा काँग्रेसला जिंकायचीच आहे.
सुभाष झांबड यांच्या नावाला मात्र माझा बिलकूल विरोध आहे. काँग्रेसचा एक आमदार म्हणून तर मी झांबड यांच्या नावाची कधीच शिफारस करणार नाही. कारण झांबड औरंगाबादेत ज्या कामगार चौकात राहतात, तेथे त्यांनी बुथ कमिट्या स्थापन केलेल्या नाहीत. ते ज्या वैजापूर तालुक्यातून येतात, तो तालुका सोडता अन्य सर्व तालुक्यांमध्ये बुथ कमिट्या स्थापन झाल्या.
सुभाष झांबड हे माझे चांगले मित्र आहेत; पण पक्षाने केलेल्या दोन सर्व्हेमध्ये त्यांचे नाव पिछाडीवर आहे. अशा उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी मी तर घेऊ शकत नाही, इतक्या स्पष्ट शब्दात सत्तार यांनी आपली भूमिका मांडली. झांबड यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात येऊ नये असा ताजा अहवाल आपण पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापासून ते सर्व संबंधितांना आम्ही कळवलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.
दोन सर्व्हे कोणातर्फे केले असे विचारता सत्तार उत्तरले, खिशातून थोडीच करणार? एजन्सीमार्फत हा सर्व्हे आम्ही करून घेतला. गेल्या पाच वर्षांपासून सुभाष झांबड हे आमदार आहेत; पण ते जेथे राहतात, तेथे साध्या बुथ कमिट्याही स्थापन करू शकले नाहीत. आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात सत्तार यांनी औरंगाबादची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यास तीव्र विरोध दर्शवला. जिल्ह्यात काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कौनसा सर्वेक्षण हुआ?
ऐसा कौनसा सर्वेक्षण हुआ है? असा सवाल उपस्थित करून सुभाष झांबड यांनी मात्र अब्दुल सत्तार यांच्या कार्यशैलीवरच आक्षेप घेतला. मग माझ्या सर्वेक्षणात मीच पुढे आहे, असेही त्यांनी नमूद केले.