औरंगाबाद: नाकाबंदीदरम्यान पोलीस अडवत असल्याचे पाहून राँग साइडने पळून जाण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार घसरून पडल्यानंतर, त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केल्याची घटना २७ मे रोजी सायंकाळी चंपाचौकात घडली. या प्रकरणी सिटीचौक ठाण्यात दोन महिलांसह चार जणांवर सरकारी कामात अडथळा आणणे आणि कोविड नियमाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस कॉन्स्टेबल सलमान शेख हे शहर विभागाच्या दंगाकाबू पथकात कार्यरत आहेत. गुरुवारी सायंकाळी त्यांचे पथक चंपाचौकात नाकाबंदी पॉइंट येथे तैनात होते. सहायक निरीक्षक खटाने, हवालदार बनसोडे आणि अन्य कर्मचारी नाकाबंदी करीत होते. तेव्हा दुचाकीस्वाराला त्यांनी हात दाखवून थांबण्याचा इशारा केला असता, त्यांना हुलकावणी देत, तो राँग साइडने पळून जाऊ लागला. यावेळी त्यांची दुचाकी स्लीप झाल्याने ते कोसळले. यावेळी कर्मचारी बनसोडे त्यांच्या मदतीसाठी गेले असता, आरोपीनी त्यांच्यासोबत हुज्जत घातली आणि त्यांना त्यांची नोकरी घालविण्याची धमकी दिली. याच वेळी दोन बुरखाधारी महिला तेथे आल्या आणि त्यांनीही तैनात पोलिसांना धमकावले. यावेळी तेथे गर्दी जमा झाली. तेव्हा एकाने त्यांना धक्काबुक्की केली. गर्दीत ते सर्व जण तेथून पसार झाले. याविषयी शेख यांनी सिटीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली.