मंत्रिमहोदयांची यात्रा शहरात गाजावाजा करीत नुकतीच विसर्जित झाली. या यात्रेत अनेक हवसे, गवसे, नवसे सामील झाले होतेच. मंत्री महोदयांना फुलहार घालून स्वागत करण्याची अहमहमिका लागली होती. अधिकाधिक फुलहार व स्वागतकर्ते समोर येतील अशी योजनाच असल्याची बोलवा कार्यकर्त्यात आहे. त्यामुळे सुरक्षेचे तीनतेरा न वाजले तरच नवल. पुंडलिकनगर ते गजानन महाराज मंदिर दरम्यानच्या रस्त्यावर मंत्र्यांना हार घालण्यासाठी काही तरुण अचानक गाडीवर चढले. त्यांनी साहेबांना फुलहार टाकून स्वागत केले. पण या काळात एवढी गर्दी झाली की काहींनी हार टाकून साहेबांच्या गळ्यातील सोनसाखळीच पळवली. पण ही बाब चाणाक्ष पोलिसांच्या लक्षात आली. सोनसाखळी घेऊन चोरटा गर्दीत मिसळला होता. पण त्यावर नजर ठेवत सुरक्षारक्षकांनी त्याला पकडले व बकलून काढत सोनसाखळी परत साहेबांना आणून दिली. तोपर्यंत आपली साखळी चोरीस गेलीय याची कल्पनाही साहेबांना नव्हती. आता साहेबांचीच सोनसाखळी चोरीला जात असेल तर सुरक्षेचे पितळ उघडे होईल म्हणून म्हणे याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची कुजबूज कार्यकर्त्यात सुरू आहे.
.