औरंगाबाद : सध्याची पत्रकारिता अवघड बनली आहे. भडक बातम्या दिल्या जातात. मात्र यात वाचक दोषी आहेत. वाचकांना जे लागत ते देण्याचे काम प्रसारमाध्यमे करतात. यातच आता जाती-जाती, धर्मांमध्ये दरी निर्माण झाली आहे. साहित्यातही प्रत्येकजण स्वत:च्या जातीच्या लेखकाविषयी चांगले तेवढेच ऐकुण घेतो. अशा परिस्थितीत जातींमध्ये विभागार्या समाजाला एकत्र ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ पत्रकार अरविंद आत्माराम वैद्य यांच्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणारा ‘अरविंद वैद्य स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले आणि संकेत कुलकर्णी यांना रा. रं. बोराडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम रोकडीया हनुमान कॉलनीतील सम्राट एंडोक्राईन संस्थेच्या सभागृहात झाला. यावेळी अरविंद वैद्य यांच्या पत्नी अर्चना वैद्य, मुलगा निरज वैद्य उपस्थित होते. या पुरस्कारात नागनाथ फटाले यांना मानपत्र, शाल, श्रीफळ आणि २१ हजार रुपये रोख देण्यात आले. तर संकेत कुलकर्णी यांना मानपत्र, शाल, श्रीफळ आणि ५ हजार रुपये रोख प्रदान केले. यावेळी बोराडे म्हणाले, पुरस्कारप्राप्त मधील एका पत्रकाराच्या सेवेचा गौरव केला. तर एकाला आगामी काळातील पत्रकारितेसाठी बळ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्कारला उत्तर देताना संकेत कुलकर्णी म्हणाले, हा पत्रकारितेतील पहिलाच पुरस्कार असल्यामुळे बळ देणारा आहे. यामुळे आता अधिक जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले. नागनाथ फटाले म्हणाले, आयुष्यभर सेवावृत्ती जीवन जगलो. पत्रकारिता ही पॅशन म्हणून केली. सत्याची बाजू मांडण्यासाठी प्रत्येकवेळी प्राधान्य दिले. याचवेळी विकास पत्रकारिता करण्याचाही अटोकाट प्रयत्न केला. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनाही विकास पत्रकारिता अनेक वर्ष शिकवली असल्याचे फटाले यांनी स्पष्ट केले.
यावेळी ‘लोकमत’ चे संपादक सुधीर महाजन यांनीही नागनाथ फटाले, अरविंद वैद्य यांच्या पत्रकारितेच्या काळातील आठवणींना उजाळा दिला. तर ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे, संजय वरकड आणि प्रमोद माने यांनीही मनोगत व्यक्त केले. नागनाथ फटाले यांनी पुरस्कारात मिळालेली २१ हजार रुपयांची रक्कम आस्था फाऊंडेशन संचलित वृद्धाश्रमाला दिली. कार्यक्रमाला डॉ. नरेंद्र वैद्य, गिरीश हंचनाळ, डॉ. पुरुषोत्तम दरक, सिंधूताई फटाले, डॉ. हेमंत फटाले, डॉ. प्रिती फटाले, रजनी कुलकर्णी, सुचिता कुलकर्णी, वैभवी कुलकर्णी उपस्थित होते.