छत्रपती संभाजीनगर : आकाशवाणी चौक व अमरप्रीत चौकातील अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे सर्वच विभागांतून संताप व्यक्त होणे सुरू झाले होते. पंधरा दिवसांत तीन मृत्यू झाल्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली. बुधवारी सायंकाळी या चौकाच्या दोन्ही बाजूने मोठे गतिरोधक बसवण्यास सुरुवात करण्यात आली. परिणामी, आता वाहनांच्या गतीवर मर्यादा येणार आहे.
२०२० मध्ये आकाशवाणी चौक व अमरप्रीत चौक 'फ्री यू-टर्न' केल्याने येथे वाहने सुसाट दामटली जात हाेती. पाच वर्षांनंतरही हा प्रयोग वादग्रस्त ठरत होता. खोळंबणाऱ्या वाहतुकीवर पर्याय म्हणून हे चौक बंद करण्यात आले. मात्र, सुसाट वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढून अनेक नागरिकांवर मृत्यू ओढवला. अपघातांची संख्या कमी होण्यासाठी आवश्यक बदलांविषयी पत्र लिहिले होते. यावर विभाग थातूरमातूर स्ट्रिप बसवून मोकळा झाला. १४ मार्च २०२४ रोजी पोलिसांनी पुन्हा गतिरोधकांसाठी पत्रव्यवहार केला होता. मात्र, तरीही विभागांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता.
१२ जून रोजी अखेर दोन्ही बाजूने 'तत्काळ' आवश्यक गतिरोधक बसवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पत्र पाठवले. त्यात खरमरीत इशारा देत यापुढे अपघात घडल्यास आमच्यासह सर्वच प्रशासकीय विभाग त्यासाठी जबाबदार राहतील, असा स्पष्ट उल्लेख केला होता. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित करून जालना रस्त्यावरील असुविधांकडे लक्ष वेधले होते. बुधवारी सायंकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी वाहतूक विभागाचे निरीक्षक अमोल देवकर यांच्यासह चौकाची पाहणी केली. त्यानंतर मोठ्या आकाराचे डांबरी गतिरोधक करण्याचा निर्णय घेण्यात आला.