मुरूमखेड: मुरूमखेड गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये भलामोठा अजगर घुसल्याची घटना समोर आली आहे. कोंबड्यांचा आवाज ऐकून पोल्ट्रीचा मालक आत गेला असता, त्याला एक अजगर दिसला. विशेष म्हणजे, मालक येईपर्यंत त्या अजगराने दोन ते तीन कोंबड्या खाऊन टाकल्या होत्या. यानंतर सर्पमित्राने त्या अजगराला मोकळ्या जागेत सोडून दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, मरूमखेड गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये नारायन बचाटे यांना मोठा अजगर दिसून आला. अजगर कोंबड्या खावून झाल्यामुळे मस्त आराम करत बसला होता. यानंतर बचाटे यांनी सर्पमित्र मनोज गायकवाड व प्रदीप बेलकर यांना ही माहिती दिली. सर्पमित्र येईपर्यंत गावकऱ्यांनी त्या अजगरावर लक्ष ठेवले.
अजगर दिसल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली, अजगराला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी बचाटे यांच्या शेतात जमली. दरम्यान, सर्पमित्र मनोज गायकवाड नारायण बचाटे यांच्या शेतात आले आणि त्यांनी त्या अजगराला सुरक्षितरित्या पकडले. पकडल्यानंतर सापाबद्दल असलेले विविध समज-गैरसमज त्यांनी दूर केले. यानंतर मनोज गायकवाड यांनी वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली अजगराला निसर्गात मुक्त केले. वनरक्षक अंकुश भागवत व रमेश शेवके वन विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.