छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठवड्यात पालकमंत्रिपदाची जबाबदारी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे आली, तर या आठवड्याच्या सुरुवातीलाच फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केली. या दोन्ही नियुक्त्यांवरून जिल्ह्याच्या राजकारणातही ट्विस्ट आले आहे. सार्वजनिक कार्यक्रमातही राजकीय टोलेबाजी, सवाल-जबाब सुरू झाल्याचे रविवारी ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातील कार्यक्रमाप्रसंगी दिसून आले.
पोलिस कवायत मैदान नूतनीकरण व सुशोभीकरणाच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्री सत्तार, खासदार कल्याण काळे यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला. यावेळी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे आदींची उपस्थिती होती.
सत्तार आणि काळे यांच्यातील मैत्रीचा धागा लोकसभा निवडणुकीपासून अगदी घट्ट झाल्याचे या कार्यक्रमात दिसून आले. सिल्लोड आणि फुलंब्री या मतदारसंघातून काळे यांना दणकावून मते मिळाली आहेत. त्यामुळे भाजपच्या मनातून हा पराभव जाता-जात नसून सत्तार-काळे ही जोडगोळी जाहीर कार्यक्रमात यावरून राजकीय शेलापागोट्याची संधी सोडत नसल्याचे दिसत आहे.
मी दोन्ही जिल्ह्यांचा खासदार : काळेखासदार काळे पालकमंत्री सत्तार यांना म्हणाले, सत्तारशेठ, तुम्ही तर शंभर दिवसाचे पालकमंत्री आहात. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आमच्या मतदारसंघाकडे लक्ष द्या. मी दोन्ही जिल्ह्यांचा खासदार आहे. सावे यांनीदेखील आमच्याकडे लक्ष द्यावे. काळे यांच्या टोमण्यावर सत्तार यांनी जबाब दिला.
गतिरोधक गेले राजस्थानला : सत्तारसत्तार म्हणाले, मला कमी दिवसच पालकमंत्री पदावर काम करण्याची संधी मिळेल. परंतु खासदार काळे, तुमच्याकडे खूप वेळ आहे. जे गतिरोधक होते, ते राजस्थानला गेले. (बागडे राज्यपाल झाल्यामुळे). आता ताण आम्हाला आहे. आमची ट्वेंटी-ट्वेंटी अजून बाकी आहे. सावेंकडे पाहून सत्तार म्हणाले, आता फुलंब्री मोकळे केल्यामुळे काळेंना मैदान मोकळे झाले आहे.