औरंगाबाद : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने क्यू आर कोड स्टीकर्स सिस्टिम कार्यान्वित केली असून, आवश्यक ती तयारी पूर्ण झाल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. योजनेची अंमलबजावणी योग्य रीतीने व्हावी, यासाठी आरटीओ कार्यालयात बुधवारी बैठक झाली.
शहरात विविध मार्गांवर धावणाऱ्या रिक्षांमध्ये प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन क्यू आर कोड असलेले स्टीकर्स बसविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. पंधरा दिवसांपासून याच्या जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. याची अंमलबजावणी योग्य त्या रीतीने व्हावी, यासाठी रिक्षाचालक आणि मालक संघटनांना प्रोत्साहन दिले जात आहे. या सिस्टिमची गुरुवारपासून अंमलबजावणी होत आहे.
क्यू आर कोडचे स्टीकर्स बसविण्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा आरटीओ कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. परवानाधारक, परवाना व चालकाचा तपशील या स्टीकर्समध्ये असणार आहे. याबाबतचे अर्ज रिक्षाचालकांनी भरून द्यावेत, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. रिक्षाचालकांनी फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट घेऊनच क्यू आर कोड स्टीकर्स रिक्षांमध्ये बसवावेत. तसेच दर्शनी भागातच हे स्टीकर्स चिटकविण्याचे आदेश आहेत.
स्टीकर्सची वैशिष्ट्ये- प्रत्येक स्टीकरला युनिक नंबर आहे. - स्टीकर्सला सेक्युरिटी फीचर्स आहेत. - स्टीकर्स न फाटणारे, वॉटरप्रूफ व न पुसले जाणारे - स्टीकर्सवरील तपशील मराठी व इंग्रजी भाषेत आहे.- स्टीकर्सवरील क्यू आर कोड ३६० कोनामध्ये स्कॅन होऊन तो मोबाईलमध्ये तात्काळ स्टोर होतो.
रिक्षाची परिपूर्ण माहिती मिळणार क्यू आर कोड असलेल्या स्टीकर्समध्ये रिक्षाची परिपूर्ण माहिती असणार आहे. काही समस्या असल्यास ते मोबाईलमध्ये स्कॅन होऊन त्यात सर्व माहिती प्रवाशांना कळू शकणार आहे. यामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणण्याचा कार्यालयाचा प्रयत्न आहे.- श्रीकृष्ण नकाते, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद.