लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ग्रामीण भागात आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, प्रत्येक घरातील एक व्यक्ती आजारी पडली आहे. जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अनेकांवर जीव गमावण्याची वेळ आली असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत केला. यावरून विरोधी सदस्यांनी अधिका-यांना धारेवर धरले. हाच मुद्दा या बैठकीत गाजला.जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा गुरुवारी येथील कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी उपाध्यक्ष सतीश टोपे, सभापती रघुनाथ तौर, दत्ता बनसोडे, सुमन घुगे, जिजाबाई कळंबे, मुख्याधिकारी दीपक चौधरी, अतिरिक्त मु्ख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, लेखाधिकारी उत्तम चव्हाण यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.सभेच्या सुरुवातीला सदस्य शालिग्राम म्हस्के म्हणाले की, विभाग प्रमुख गैरहजर राहून कनिष्ठ कर्मचा-यांना सभेला पाठवतात. त्यामुळे आम्ही आमच्या नातेवाईकांना सभेला पाठवायचे का? यावर अध्यक्षांनी माहिती घेतली असता, बहुतांश विभागप्रमुख सभेस गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ग्रामीण भागात सध्या दूषित पाणीपुरवठा होत असून, बहुतांश गावांमध्ये तापाचे रुग्ण वाढले आहेत. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कुठल्याच सुविधा नाहीत. औषधी उपलब्ध नाहीत. आरोग्य केंद्रात गेल्यानंतर डॉक्टर, परिचारिका हजर राहत नाहीत. त्यामुळे गोरगरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. रक्त नमुने घेण्यासाठी आवश्यक साधने आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही. तापाची गोळी वाटप करण्यापलीकडे आरोग्य विभाग काहीच करत नसल्याचा आरोप म्हस्के यांनी केला. यावर आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी अध्यक्षांच्या सूचनेवरून खुलासा सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावर विरोधी सदस्यांचे समाधान झाले नाही. आरोग्य विभागाकडे ४५ फॉगिंंग मशीन उपलब्ध असताना ग्रामीण भागात कुठेच धूर फवारणी केली जात नाही.मशीन नादुरुस्त असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचे प्रकार आरोग्य विभागाचे कर्मचारी करीत असल्याचा आरोप जयमंगल जाधव यांनी केला. आरोग्य अधिकारी खोटे बोलून वेळ मारून नेण्यात पटाईत असल्याचे ते म्हणाले. विविध विभागांत प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचा-यांमुळे सर्वच विभागांचे कामकाज ढेपाळले आहे. अशा कर्मचाºयांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करावी, अशी मागणी अवधूत खडके यांनी केली. यावर अध्यक्ष खोतकर यांनी काही विभागांत कर्मचारी कमी असल्यामुळे प्रतिनियुक्तीवर कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आल्याचे सागितले.
स्थायी समितीत खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:57 AM