औरंगाबाद : देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला असून, फुलंब्री ग्रामीण रुग्णालयाच्या धर्तीवर अंदाजपत्रक केले जात आहे. लवकरच हा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी सादर होईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी दिली.
वर्दळीच्या रस्त्यावरील असलेले देवगाव रंगारीचे तीस खाटांचे मंजूर रुग्णालय सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू आहे. त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. तसेच या मृत किंवा मेडिको लिगल प्रकरण औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवावे लागते. यामुळे नातेवाईकांची दमछाक होते. ग्रामीण रुग्णालयाच्या नव्या इमारतीसाठीची जागा नावावर झाली असून, त्यासाठी सध्या अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम बनवत आहे. तसेच शवविच्छेदन कक्ष आणि बायोमेडिकल वेस्टसाठी डिप बरियल पीटसाठी १० लाख ८५ हजारांचा निधी प्राप्त झाला असून हे कामही सुरू होईल, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.