औरंगाबाद : औषधी खरेदी घोटाळ्यांना पायबंद घालण्यासोबतच तिच्या खरेदीमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी ‘हाफकिन’च्या माध्यमातून प्रक्रिया पार पाडली जात आहे. यामुळे औषधी खरेदीत एकसूत्रता आली आहे. मात्र, घाटी रुग्णालयात उघडकीस आलेल्या सदोष इंजेक्शनच्या प्रकरणामुळे औषधीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त रुग्णालये, आरोग्य संस्थांसाठी औषधे, उपकरणे व साधनसामग्रींची खरेदी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फ त करण्यात येत होती, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांसाठी औषधी, उपकरणे व साधनसामग्री यांची खरेदी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागामार्फ त करण्यात येत होती.
वेगवेगळ्या विभागांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या एकाच प्रकारच्या औषधी, उपकरणे व साधनसामग्रीच्या दरामध्ये व मानांकनामध्ये तफावत आढळून येत असे. ही तफावत दूर करण्यासाठी तसेच खरेदीमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी महामंडळ स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. औषधी खरेदी घोटाळ्यांना पायबंद घालण्यासोबतच तिच्या खरेदीमध्ये एकसूत्रता आणण्याची जबाबदारी ‘हाफकिन’ मंडळावर सोपविण्यात आली आहे. सध्या ‘हाफकिन’कडूनच औषधी खरेदी प्रक्रिया होत आहे.
गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्याचे काम घाटी रुग्णालय करीत आहे; परंतु वॉर्डावार्डांपर्यंत औषधी पोहोचेपर्यंत, त्यातील दोष यंत्रणेतील साखळीला समजत नाही, ही बाब घाटीतील प्रकाराने समोर आली आहे. यामुळे भविष्यात रुग्णसेवेत गंभीर चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान घाटीतील २२ नोव्हेंबर रोजी वॉर्डांमध्ये संबंधित सदोष इंजेक्शन वापरण्यात येऊ नये, असे कळविण्यात आले, तरीही ४२ हजार इंजेक्शन चार दिवसांनंतरही वॉर्डांमध्येच राहिले. हे इंजेक्शन्स वॉर्डातून परत घेण्याचे काम मंगळवारी करण्यात आले.
शासनाकडे मागणी, ‘हाफकिन’कडून पुरवठाशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून शासनाकडे औषधींची मागणी केली जाते. त्यानंतर हाफकिनच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबविण्यात येते. निविदा निश्चित केल्यानंतर आॅर्डर दिली जाते आणि औषधीपुरवठा होतो. सदोष निघालेल्या औषधीही या प्रक्रियेनंतर घाटीला प्राप्त झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
नमुने तपासणीसाठी मुंबईलाघाटीतील सदोष औषधींचे घेतलेले नमुने तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई होईल, अशी माहिती औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे यांनी दिली.