परभणी: राष्ट्रीयस्तरावर गेल्या साठ वर्षांपासून सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस पक्षाच्या तसेच सहा महिन्यांपूर्वी केंद्रामध्ये एकहाती सत्तेमध्ये आलेल्या भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांची विधानसभा निवडणुकीतील जिल्ह्यातील कामगिरी अत्यंत असमाधानकारक राहिली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
परभणी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची फारशी ताकद नाही. एकेकाळी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात पक्षाचे वर्चस्व होते. सलग चार वेळा येथे पक्षाचा उमेदवार निवडून आला. परंतु, पक्ष संघटन वाढविण्याकडे या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष दिले नाही. उलट तडजोडीच्या राजकारणात यावेळी गंगाखेडची जागा भाजपाने राष्ट्रीय समाज पक्षाच्या पारड्यात टाकली. यासंदर्भातील निर्णय घेताना स्थानिक कार्यकर्त्यांशी वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली की नाही, हा वेगळाच विषय आहे. परंतु, एकीकडे देशपातळीवर एकहाती सत्तेत आलेल्या व राज्यात एकहाती कारभार करण्यासाठी २५ वषार्ंची युती तोडून अस्तित्वाची लढाई लढलेल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे याकडे कसे काय दुर्लक्ष झाले? असा सवाल उपस्थित होत आहे. केवळ तीन जागांसाठी शिवसेना-भाजपाची युती तुटली, असे सांगणारे पक्षाचे वरिष्ठ नेते या जागेसंदर्भात कसे काय गंभीर नव्हते, हाही प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय परभणी विधानसभा मतदारसंघात पक्षाने आनंद भरोसे यांना उमेदवारी दिली. भरोसे यांनी ४२हजार ५१मते मिळवित विधानसभेला पहिल्यांदाच भाजपाचे कमळ मतदान यंत्रावर आणले. असे असले तरी भाजपाच्या मूळ कॅडरने पक्षाचे काम केले ? हाही सवाल उपस्थित होत आहे.
जिंतूर विधानसभा मतदारसंघात पक्षाचे उमेदवार संजय साडेगावकर यांनी जवळपास ३0 हजार मते मिळवित तिसरा क्रमांक मिळविला. परंतु, साडेगावकर यांनाही पक्षाचे गांभीर्याने घेतले नाही. पाथरी विधानसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडून देण्यात आला. यामुळे पक्षाचे जिल्ह्यात काय धोरण आहे? जिल्ह्यात पक्षीय संघटन मजबूत आहे का? हे ही पाहणे आवश्यक आहे. केवळ वरिष्ठ नेत्यांचा दौरा आल्यानंतर कार्यक्रमाचा अन् गर्दीचा देखावा करायचा आणि नेत्यांच्या कारचा धुरळा खाली बसला की, घरी निघून जायचे, अशीच स्थिती होती, हे पाहण्याची तसदी वरिष्ठ नेत्यांनी घेतली नाही. त्यामुळेच आज या पक्षाची जिल्ह्यात दयनीय अवस्था दिसून येत आहे.
दुसरीकडे काँग्रेस पक्षाचेही जिल्ह्यात समाधानकारक काम नाही. या पक्षातही कुरघोडीचे राजकारण मोठय़ा प्रमाणात चालते. पक्षापेक्षा व्यक्तीय राजकारणाला अधिक महत्त्व दिल्याने म्हणावे तसे यश मिळाले नाही. उत्साही काँग्रेसच्या (नेत्यांच्या नव्हे ) कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम कधी झाल्याचे दिसून आले नाही. मग सुजाण मतदारराजाला काँग्रेसला मतदान करावे की उमेदवाराला, असा सहाजिकच प्रश्न पडणार. या प्रश्नांचे उत्तर वरिष्ठ नेत्यांना देता आले नाही. पक्षीय संघटन मजबूत करण्याचा विचारही या राष्ट्रीय पक्षांना आला की नाही. त्यामुळे पक्षाचा पराभव झाला की, उमेदवाराचा, हे एक कोडेच आहे. हे कोडे राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांनाच सोडवावे लागणार आहे. / मनसेची दयनीय अवस्था
४/जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रादेशिक पक्षाचीही दयनीय अवस्था दिसून आली. केवळ गंगाखेडमध्येच पक्षाचे अस्तित्व दिसून आले. पाथरीमध्ये पक्षाला सहा हजारांचा आकडा पार करता आला नाही. तर परभणीतील उमेदवार शिवसेनेत गेला अन् जिंतूरच्या उमेदवाराने माघार घेतली, मग यश कसे मिळणार ?
■ राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे प्रादेशिक पक्ष चमकल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षाचेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी वर्चस्व दिसून येते. या पक्षांनी निवडणुकीत आखलेल्या रणनितीमुळे त्यांना यश मिळाले. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांनीच या प्रादेशिक पक्षांकडून धडा घेणे आवश्यक आहे. या विधानसभा निवडणुकीने तसे अनेकांना खूप काही शिकविले आहे.