औरंगाबाद : शहरातील तीन दरवाजे आणि त्यांना लागून असलेल्या पुलांचा प्रश्नही आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. शुक्रवारी सकाळी महेमूद गेटचे काही अवशेष कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही. दरवाजांना लागून असलेले पूलही कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या मार्गावर आहेत. पूल धोकादायक असल्याचा निर्वाळा सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच वर्षांपूर्वीच दिल्यानंतरही २४ तास त्यावरून वाहतूक सुरू आहे. पूल कोसळून निष्पाप नागरिकांचे रक्त सांडल्यानंतरच महापालिका काही ठोस निर्णय घेणार आहे का? असा संतप्त सवाल औरंगाबादकरांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
महेमूद गेटशुक्रवारी सकाळी पाणचक्कीजवळील महेमूद गेटच्या आतील लाकडी दरवाजाही निखळला. गेटचे अवशेषही खिळखिळे झाले असून, तेसुद्धा कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या मार्गावर आहेत. गेटला लागून असलेल्या पुलाची अवस्थाही अत्यंत विदारक आहे. सुमारे ३५० वर्षांपूर्वी या पुलाची उभारणी करण्यात आली. १७३० मध्ये पूल बांधण्यात आला. पाणचक्की येथील शाह सईद तिलंग पोश, त्यांचे पुतणे बाबा शाह मुसाफीर या बुर्जुग मंडळींचे शिष्य महेमूद शाह मुसाफीर यांनी तेव्हा २० हजार रुपये खर्च करून पाणचक्की, पूल, गेटची उभारणी केली आहे. पुलाचे आयुष्य संपल्याचा निर्वाळा देण्यात आला असतानाही वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे महेमूद दरवाजा दिवसेंदिवस खिळखिळा होत आहे.
बारापुल्ला गेटमिलकॉर्नरपासून हाकेच्या अंतरावर खाम नदीवर उभा असलेला गेट म्हणजे बारापुल्ला गेट होय. या गेटला लागूनच मोठा ऐतिहासिक पूल आहे. छावणी, भावसिंगपुरा भागातील दीड ते दोन लाख नागरिकांना दररोज ये-जा करण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. ज्या पद्धतीने गेटची अवस्था झाली आहे, त्यापेक्षा कितीतरी वाईट अवस्था बारापुल्ला या ऐतिहासिक पुलाची झाली आहे. हा पूलही धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला आहे. महापालिकेने आजपर्यंत यावरील वाहतूक थांबविलेली नाही. या पुलावर किंवा दरवाजात मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता इतिहासप्रेमींकडून वर्तविण्यात येत आहे.
मकाई गेटघाटीजवळील ऐतिहासिक गेट म्हणजे मकाई गेट होय. औरंगजेब यांच्या काळात गेट आणि पुलांची उभारणी करण्यात आली आहे. खाम नदीवर सर्वात मोठा पूल आहे. याची उंचीही इतर पुलांपेक्षा खूप जास्त आहे. मकबऱ्याकडे जाणारे असंख्य पर्यटक याच गेट आणि पुलावरून ये-जा करतात. हा पुल धोकादायक झाल्याने भविष्यात दुर्घटना होऊ शकते.
योजना कागदावरचमागील दहा वर्षांपासून महेमूद गेट, बारापुल्ला गेट, मकाई गेट येथे दोन्ही बाजूने रस्ता करावा. पुलांची उभारणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. ५ वर्षांपूर्वी राज्य शासनाने ११ कोटी रुपये पुलांसाठी जाहीर केले होते. हा निधी शहरापर्यंत आलाच नाही. महापालिकेकडे निधी नाही. पुलांची उभारणी करण्यासाठी राजकीय मंडळी शासनाकडे पाठपुरावा करायला तयार नाही. या तिन्ही दरवाजांमध्ये महाडसारखी दुर्घटना घडल्यास शासन आणि महापालिकेला जाग येणार आहे का? असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.