जालना: शहरातून दिवसाकाठी निघणाऱ्या तब्बल ८० टनांपेक्षा अधिक कचऱ्याची विल्हेवाट लावावी कोठे, असा मोठा पेच पालिकेसमोर आहे. पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहर कचरामय बनले आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागावी म्हणून सहा वर्षांपासून लाखो रुपर्य खर्चून तयार होत असलेला घनकचरा प्रकल्प लाल फितीच्या कारभारात अडकला आहे.२००८-०९ मध्ये पालिकेने सामनगाव परिसरात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी घनकचरा प्रकल्पाची प्रक्रिया सुरु करण्यात आली. आजपर्यंत येथे संबंधित एजन्सीने ६४ लाख रुपयांची यंत्रणाही बसविली आहे. बाराव्या वित्त आयोगातील निधीतून इतर कामे करण्यात आली.सहा वर्षे उलटली असली तरी हा प्रकल्प का सुरु झाला नाही, हा संशोधनाचा विषय आहे. हा प्रकल्प सुरु करण्यासाठी तेराव्या वित्त आयोगातून निधी मिळावा म्हणून पालिका प्रयत्नशील असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. एकूणच हा प्रकल्प प्रशासकीय मान्यतेत आडकल्याने समस्या जटिल बनली आहे. हा प्रकल्प जैसे थेच असल्याने कचरा टाकण्यासाठी इतर ठिकाणीही जमीन संपादित करण्यात येत नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. शहरातील वाढत्या कचऱ्यावर कायमस्वरुपी उपाय केंव्हा होणार असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.स्वच्छता विभागाच्या म्हणण्यानुसार शहर कचरामुक्त करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी पालिकेकडून नियोजन करण्यात येते. नदीपात्र अथवा इतर ठिकाणी कचरा टाकण्यात येत नाही. कचऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने नागरिकांनीही सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. याविषयी नगराध्यक्षा पद्मा भरतिया म्हणाल्या, प्रकल्पाचे काम सुरु झाल्यापासून आतापर्यंत झालेल्या सर्वच खर्चाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एएसआर नायक यांनी दिले आहेत. कामाचे मूल्यांकन त्या काळातील यंत्रणेची चौकशी करुन जबाबदारी ठरविली जाणार आहे. राज्य शासनाकडून हा प्रकार गांभीर्याने घेण्यात आला आहे. शिवाय कंपनीकडूनही कामाच्या बाबतीत दिरंगाई झाली. त्यामुळे हा प्रकल्प रखडलेला आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर हा प्रकल्प मार्गी लागू शकतो. (प्रतिनिधी)शहरात दररोज निघतो ८० टन कचराआयएसओ दर्जा प्राप्त पालिकेला शहर कचरामुक्त करण्यात यश आलेले नाही. शहरातील विविध रस्ते, प्रभाग, वसाहती मिळून सर्व प्रकारचा मिळून ८० टन कचरा निघतो. सर्व कचरा पालिकेकडून उचलला जात नाही, हेही वास्तव आहे. कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. पालिकेकडून कचरा उचलण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी वाढत्या कचऱ्यापुढे पालिकेची यंत्रणाही तोकडी पडत असल्याचे चित्र आहे.
कचरा विल्हेवाटीचा पालिकेसमोर प्रश्न
By admin | Published: June 12, 2014 1:00 AM