औरंगाबाद: भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भडकलगेट येथे रविवारी दिवसभर अनुयायांची रांग लागून होती. त्यात राजकारणी, समाजकारणातील मान्यवरांसह, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, नागरिक, महिला व मुलामुलींचा समावेश होता. हाती पुष्पहार, मेणबत्ती व मनी दाटलेल्या ओतप्रेत आदरभावनांची सुमने महामानवाच्या चरणी अर्पण करतांना येथील वातावरणही गंभीर झाले होते.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने घरीच बाबासाहेबांना अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आलेले होते. त्यामुळे भडकलगेट परिसरात दरवर्षीप्रमाणे गर्दी दिसत नव्हती. पण अभिवादनासाठी सुरक्षित अंतर राखित रांग लागलेली होती. ही रांग दिवसभर संपली नाही. अभिवादन करून जो-तो शांततेने परत फिरत होता. त्यामुळे पुतळ्याच्या पायथ्याशी हजारो फुलहारांचा भला मोठा ढीग दिसत असला तरी अनुयायांची गर्दी नव्हती. ना घोषणा, ना गीते. धीरगंभीर वातावरण सर्वत्र पसरलेले होते. तेवणाऱ्या अनेक मेणबत्त्या व अगरबत्त्याच्या सुगंधाने परिसर भरून गेला होता. आंबेडकरी अनुयायी कुटुंबासह शुभ्र वस्त्रात येऊन प्रेरणास्थानाला वंदन करून निघून जात होते. येथे जो तोच स्वयंसेवक होता. प्रत्येक जण शिस्त पाळत होता. त्यामुळे पोलीसही त्यांच्या वाहनात व सावलीत बसून होते. परंतु अभिवादनाची रांग काही केल्या संपत नव्हती.
यंदा परिसरात अभिवादनाचे पोस्टर्सही नव्हते किंवा गायन पार्ट्याही नव्हत्या. एखादा अपवाद वगळता बुकस्टाॅलही नव्हते. बाजूच्याच शाळेच्या प्रांगणात अखिल भारतीय बौद्ध महासभेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रज्ञासूर्यासमोर नतमस्तक होऊन घरी परततांना अनेक जणांनी तेथे जाऊन रक्तदान करून आदरांजली वाहिली. दुपारी १ वाजेपर्यंत शंभराहून अधिक भीमअनुयायांनी रक्तदान केल्याचे किशोर जोहरे यांनी सांगितले.