छत्रपती संभाजीनगर: 'हीट अँड रन' कायद्याच्या विरोधात टँकर चालक पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याच्या अफवेने शहरात पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र, पेट्रोलियम डिलर संघटनेचे शहराध्यक्ष अखिल अब्बास यांनी स्पष्टीकरण दिले असून पेट्रोल- डिझेलचे टँकर चालक संपावर जाणार याबाबत कोणतीही माहिती चालकांच्या संघटनेने दिलेली नाही. यामुळे पंपावर गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.
सोशल मिडियातून पसरली अफवाट्रक चालक संपावर जाणार असल्याने पेट्रोल पंप बंद असतील अशा आशयाची अफवा सोशल मिडियातून शहरात पसरली. यामुळे काही वेळातच शहरातील सर्व पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी केली. चार दिवस पेट्रोल पंप बंद राहतील, असे सोशल मिडियातून कळल्याचे काही वाहनधारक पंपावर सांगत होते.
.. तर कृत्रिम टंचाई निर्माण होईल पेट्रोल- डिझेलची वाहतूक करणारे टँकर चालक संपावर जाणार याबाबत त्यांच्या संघटनांनी काहीच जाहीर केलेले नाही. यामुळे शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अफवेमुळे पंपावर गर्दी होत आहे. यामुळे इंधनाची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते. कोणीही अफवेस बळी पडू नये. - अखिल अब्बास, अध्यक्ष, पेट्रोलियम डिलर संघटना