उमरगा : उमरगा नगर परिषदेची नगराध्यक्षांनी बोलाविलेली विशेष सभेची बैठक नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे तहकूब करावी लागली. त्यामुळे शहरातील भीषण टंचाईवर तोडगा काढण्यासोबतच इतर विकास कुठलीही चर्चा होवू शकली नाही. उमरगा नगरपालिकेत एकूण २३ नगरसेवक आहेत. त्यात सत्ताधारी सेना-भाजपाच्या १४ सदस्यांचा समावेश आहे. या सभेला नगराध्यक्षासह सेना-भाजपाचे केवळ ४ नगरसेवक उपस्थित होते. परंतु, त्यापैकी दोघांनी सभागृहामध्ये कोणीच उपस्थित नसल्यामुळे आम्ही सभागृह सोडून जात असल्याचे पत्र पिठासीन अधिकाऱ्यांना देवून ही सभा रद्द करावी, अशी मागणी केली. तसेच नगराध्यक्षा केवलबाई औरादे यांनीही विशेष सभा गणपूर्तीअभावी तहकूब करण्यात यावी व शनिवारी परत बोलाविण्यात यावी, असे पत्र पिठासीन अधिकाऱ्यांना दिले. या पत्राआधारे पिठासीन अधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी ही सभा तहकूब केली. नगराध्यक्षांनी बुधवारी सकाळी ११ वाजता ही विशेष सभा बोलाविलेली होती. परंतु शहराच्या विकासासाठी बोलाविलेल्या बैठकीला २३ नगरसेवकांपैकी नगराध्यक्ष व केवळ ३ नगरसेवक हजर राहिले. सत्ताधारी पक्षातील रज्जाक अत्तार व बालाजी सुरवसे यांनीही या सभेच्या कामकाजाचे पत्र मिळाले. त्यानुसार आम्ही सह्या केलेले नगरसेवक सभेमध्ये दाखल झालो. पण कोणीही उपस्थित नसल्याने आम्ही सभागृह सोडून जात आहोत,असे पत्र पिठासीन अधिकाऱ्यांना देवून सभागृहातून निघून गेले. त्यामुळे नगराध्यक्षांनी ही सभा सदस्य गणपूर्तीअभावी तहकूब करण्यात यावी, असे पिठासीन अधिकाऱ्याला सुचवले व तसे पत्र देवून ही सभा तहकूब केली. या सर्व घडामोडीनंतर विरोधी पक्षाचे आठ सदस्य सभागृहामध्ये दाखल झाले. यावेळी पिठासन अधिकाऱ्यांनी त्यांना ही सभा तहकूब करण्यात आल्याचे सांगितले. आजच्या विशेष बैठकीतील विषय शहरात आगामी काळात पावसाळ्याअभावी उद्भवणारा पाणी प्रश्न शहरातील नवीन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आष्टा धरणापासून पाईपलाईन टाकणे संदर्भात चर्चा करुन निर्णय घेणे, आष्टा धरणातील विद्युतपंपाच्या नवीन साहित्य खरेदीस मान्यता प्रदान करणे, नवीन निविदेवर चर्चा करुन मान्यता देणे, माकणी ते उमरगा पाईपलाईन गळती दुरुस्तीस मान्यता देणे अशा विविध १२ विषयावर चर्चा होणार होती. परंतु, नगरसेवकांना शहरातील कुठल्याच प्रश्नाचे गांभिर्य नसल्याचा आरोप शहरवासियांतून होत आहे. (वार्ताहर)
कोरमअभावी सभा तहकूब
By admin | Published: August 27, 2015 12:03 AM