औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा १५० टक्के पाऊस झाला. परिणामी विभागातील सर्व धरणे शंभर टक्के भरली असून, त्याचा फायदा सिंचनाला होणार आहे. आगामी रबी आणि खरीप हंगामात विभागातील जायकवाडी, निम्न दुधना, नांदूर मधमेश्वर कालवा या मोठे प्रकल्पावरील सिंचन पाणी नियोजनासाठी प्रथम पाणीपाळी राबविण्याच्या दृष्टीने १४३८ दशलक्ष घनमीटर पाणी टप्प्याने सोडण्यात येणार आहे.
कालवा सल्लागार समितीची २०२०-२१ ची बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन झाली. धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करून प्राधान्याने पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना अध्यक्ष चव्हाण यांनी दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी जायकवाडी, निम्न दुधना, नांदूर मधमेश्वर कालवा या मोठ्या प्रकल्पावरील रबी प्रथम आवर्तनासाठी मान्यता दिली. बैठकीत प्रकल्पावरील उपलब्ध पाण्याचे रबी व उन्हाळी हंगामाच्या नियोजनाबाबत अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सादरीकरण केले.
जायकवाडी प्रकल्पातील नियोजन असे
जायकवाडी प्रकल्पाचे दोन्ही कालव्यावरील लाभक्षेत्र औरंगाबाद, जालना, परभणी व अहमदनगर जिल्ह्यात आहे. १ लाख २० हजार हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी १७० दलघमी पाणी देण्यास मान्यता दिली आहे. दोन्ही कालव्यावर १ लाख ४६ हजार ९०० हेक्टर व ५३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित करणे नियोजित आहे. त्यासाठी ११४८ दलघमी पाणीवापर अपेक्षित आहे.
नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून इतके पाणी देणार
नांदूर मधमेश्वर प्रकल्पावरील लाभक्षेत्र हे औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्ह्यात मुकणे, भाम, भावली व वाकी धरणांत १०० टक्के पाणीसाठा आहे. बाष्पीभवन, घरगुती व औद्योगिक पाणीवापर, धरणाखालील बंधाऱ्यात पाणी सोडल्यानंतर उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रबी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे २ आवर्तन देणे प्रस्तावित आहे. धरणांतून १३८ दलघमी पाणीवापर अपेक्षित आहे.
लोअर दुधनातून इतके पाणी
लोअर दुधना धरणात १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. बाष्पीभवन होऊन उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रबी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे प्रत्येकी ३ पाणी आवर्तन देणे प्रस्तावित आहे. यात १५ हजार १०० व ५ हजार ९२० हेक्टर क्षेत्र सिंचित करणे नियोजित असून त्यात १५२ दलघमी पाणीवापर होईल.