औरंगाबाद: दुसऱ्याच व्यक्तीच्या मालमत्तेचा सातबारा मिळवून त्याआधारे स्वत:चे छायाचित्र चिकटवून ऐपत प्रमाणपत्र मिळवून न्यायालयातून गुन्हेगारांचा जामीन घेणाऱ्या रॅकेटचा गुन्हेशाखेने बुधवारी पर्दाफाश केला. या रॅकेटमधील ११ जणांना पोलिसांनी मध्यरात्री अटक केली असून यात चार महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कुख्यात सिरिअल किलर इम्रान मेहदीच्या गँगमधील दोन जणांचा जामीन घेण्याच्या तयारीत असताना मुख्य आरोपीला पकडण्यात आले. सुमारे पाच ते सात वर्षात या रॅकेटने औरंगाबादसह नाशिक, पुणे आणि मुंबईसह अन्य शहरात सुमारे चारशे ते पाचशे जणांचा जामीन घेतल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
शेख मुश्ताक शेख मुनाफ(३६,रा. रशीदपुरा, हिनाननगर), पूनम दिगंबर सावजी उर्फ गणोरकर(६२,रा. हडको एन-१२), रोशनबी शेख सलीम (४८,रा. चेलीपुरा, काचीवाडा), वसीम अहेमद खान शमीम अहेमद खान (४६,रा. नालासोपारा, पालघर), अयुब खान रमजान खान (५२,रा. बायजीपुरा, इंदीरानगर), शेख जावेद शेख गणी (२०,रा. अंबरहिल, जटवाडा रोड), लालचंद ब्रदीलाल अग्रवाल( ५१,रा. लेबर कॉलनी), टिपलेश अनिल अग्रवाल(२३,रा. लेबर कॉलनी),खातूनबी शेख हसन (५०,रा. पंढरपुर, तिरंगा कॉलनी) , नसीम बेगम शकली खान शेख हसन (४९,रा. सईदा कॉलनी), पायल नाना दांडगे उर्फ फातेमा जावेद शेख (१९,रा. अंबरहिल)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले की,पोलीस गुन्हेगारांना अटक करून न्यायालयात हजर करीत असते. अटकेतील आरोपींचा बनावट ऐपत प्रमाणपत्रासह अन्य कागदपत्राच्याआधारे(सॉल्वन्सी) जामीन मिळविणारे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती खबऱ्याने दिली होती. शिवाय याबाबतचा एक तक्रारअर्ज पोलीस आयुक्तांना प्राप्त झाला होता. तेव्हापासून गुन्हेशाखेचे पोलीस हे रॅकेट कसे चालते, आणि न्यायालयात कोण सतत जामीन घेण्यासाठी येतो, याबाबत सखोल माहिती घेत होते. तेव्हा शेख मुश्ताक हा सतत न्यायालयात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. शिवाय तोच गुन्हेगारांकडून पैसे घेऊन त्यांची जामीन करीत असल्याची माहिती मिळाली.
यांनतर मुश्ताकसह त्याच्या साथीदारांनी अलीकडच्या काळात सात गुन्हेगारांचे जामीन घेतल्याचे समजले. त्या जामीनसंबंधी कागदपत्राची पोलिसांनी तपासणी केली असता, वेगवेगळ्या पाच संपत्तीच्या ऐपत प्रमाणपत्रावर एका व्यक्तीचे छायाचित्राखाली वेगवेगळी नावे दिसली. यानंतर पोलिसांनी टोळीचा प्रमुख शेख मुश्ताकला प्रथम ताब्यात घेतले आणि नंतर एकापाठोपाठ अकरा आरोपींना उचलले. तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली देत, बनावट ऐपत प्रमाणपत्र तयार करण्याचे काम अग्रवाल त्याच्या झेरॉक्स सेंटर मध्ये करीत होता , असे सांगितले.
ही कारवाई पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त मिना मकवाना, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधूकर सावंत, सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक विजय पवार, योगेश धोंडे, कर्मचारी सुनील बडगुजर, शिवाजी झिने, सय्यद मुजीब, राजेंद्र साळुंके, दत्तात्रेय गढेकर, गजानन मांटे, प्रभाकर राऊत, शेख नवाब, विरेश बने, नितीन देशमुख, संजय जाधव, संदीप सानप, सुनील बेलकर यांनी केली.