छत्रपती संभाजीनगर : जिलेबी देण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून गारखेड्यातील गुरूकृपा फरसाण मार्टमध्ये ग्राहक व दुकानदारामध्ये तुंबळ हाणामारी झाली. १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी ग्राहक व हॉटेल चालकाच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले.
सुनील धनेधर (३२) हा मित्रासह सदर दुकानात जिलेबी खरेदीसाठी गेले होते; मात्र जिलेबी देण्यास उशीर होत असल्याने धनेधर यांनी विचारणा केली. काही वेळाने त्यांचे दुकानदारासोबत वाद झाले. एकाने थेट त्यांना पैशांवरून हिणवल्याने वाद वाढले. धनेधर यांनी ११२ क्रमांकावर काॅल करण्याचा प्रयत्न करताच, त्यांच्यावर प्रदीप पाटील व अन्य चार ते पाच कर्मचाऱ्यांनी झाऱ्याने वार करून मारहाण करून त्यांचा मोबाईल फोडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी पाटील व त्याच्या अन्य साथीदारांवर १९ मे रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला तर प्रदीप शिरसाठ यांच्या तक्रारीनुसार, धनेधर व त्यांच्या मित्रांनी जिलेबी उशिरा देण्यावरून वाद घातले. त्यानंतर दुकान चालवू देणार नाही, अशी धमकी देत गंभीररीत्या मारहाण केल्याची तक्रार दिली. दोन्ही गटाच्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.