औरंगाबाद : कॅनॉट येथील एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आलेल्या युवकांना दिलेल्या सलाडमध्ये कांद्याला कोंब आलेला होता. त्यावरून वेटरसोबत झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर राड्यामध्ये झाले. हा प्रकार शुक्रवारी (दि.२६) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडला. यात हॉटेलमध्ये दोन जण जखमी झाले असून, सिडको पोलिसांच्या सतर्कमुळे पुढील अनर्थ टळाला. याप्रकरणी सिडको पोलिसांतर्फेच तक्रार देत मध्यरात्रीनंतर गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॅनॉट येथील हॉटेल व्हीआयपी मराठामध्ये ब्रिजवाडी येथील दोन युवक जेवणासाठी आले होते. त्यांच्या जेवणातील सलाडमध्ये कांद्याला कोंब आलेला होता. त्यावरून त्यांची वेटरसोबत बाचबाची झाली. हा वाद सुरुवातीला मिटविण्यात आला. जेवणानंतर त्या युवकांनी ब्रिजवाडीतील इतरांना बोलावून घेतले. त्यामुळे पुन्हा हॉटेलसमोर राड्याला सुरुवात झाली. ब्रिजवाडीतील आलेल्या युवकांनी हॉटेलमध्ये दोन वेटरला मारहाण केल्याचे स्पष्ट झाले. या राड्यामुळे परिसरातील बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमा झाली.
घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला. त्याचवेळी सिडको ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार, सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी तात्काळ दाखल झाला. त्यामुळे राडा करणाऱ्या ब्रिजवाडीतील युवकांनी धूम ठोकली. या हाणामारीत हॉटेलमधील दोन जण जखमी झाले असून, त्यांच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या घटनेविषयी हॉटेलमालकासह इतरांना तक्रार देण्याच्या सूचना निरीक्षक पवार यांनी केल्या. मात्र, कोणतीही तक्रार देण्यास तयार नसल्यामुळे पोलिसांनीच तक्रार देत रस्त्यावर राडा करणे, गोंधळ करणे आदी कलमान्वये गुन्हा नोंदविला.
प्रकरण आपसात मिटवलेराड्यातील दोन्ही बाजूंकडील लोक ओळखीचे निघाल्यामुळे प्रकरण आपसात मिटवून घेण्यात आले. कोणीही तक्रार देण्यास पुढे आले नाही. मात्र, सिडको पोलिसांनी स्वत: तक्रार देत रस्त्यावर धुडगूस घालणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस जमा करीत आहेत.