औरंगाबाद :भाजपाच्या केंद्रीय सचिव पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली नसल्यामुळे भाजपच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी केल्यानंतर केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या अजबनगर येथील कार्यालयासमोर रविवारी सायंकाळी राडा करणारे दोघेही दारु पिलेले असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांच्या विरोधात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. हे दोघे मुंडे यांचे समर्थक असल्याचा दावा करतात, मात्र ते कोणत्याही पदावर कार्यरत नसल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेच्या निवडणूक डावलल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यासनंतर पंकजा मुंडे यांचा समर्थक असल्याचा दावा करणारा सचिन डोईफोडे याच्यासह सहा जणांनी भाजपाच्या उस्मानुपरा येथील कार्यालयासमोर राडा केला होता. या प्रकरणी डोईफोडे याच्यासह इतर सहा जणांच्या विरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेनंतर सचिन प्रल्हादराव डोईफोडे, योगेश खाडे या दोघांनी रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड कार्यालयात असल्याची माहिती मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यासाठी दाखल झाले. मात्र, डॉ. कराड हे कार्यालयात नव्हते. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत ठाण्यात आणले. त्यानंतर दोघांची वैद्यकीय तपासणी केली असता, दोघेही दारु पिलेले असल्याची समोर आले. या प्रकरणी सहायक फाैजदार सुभाष चव्हाण यांच्या तक्रारीवरुन दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास सहायक निरीक्षक डॉ. विशाल इंगळे करीत आहेत.
मारहाण करणाऱ्यांवरही गुन्हे दाखलकेंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या कार्यालयासमोर राडा करण्यासाठी आलेल्या सचिन डोईफोडे यास त्यांच्या समर्थकांनी बेदम चोप दिला होता. हा चोप देणाऱ्या ५ ते ८ कार्यकर्त्यांच्या विरोधातही क्रांती चौक ठाण्यात गुन्हा नोंदवला. यात उपनिरीक्षक विकास खटके यांनी तक्रार दिली. या प्रकरणाचाही तपास सहायक निरीक्षक डॉ. विशाल इंगळे करीत आहेत.