वाळूज महानगर : विटावा ग्रामपंचायत कार्यालयात प्लॉटिंगच्या नोंदीवरून महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यात राडा झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४.३० च्या सुमारास घडली. या घटनेत दोघांचे समर्थक आमनेसामने येऊन त्यांच्यात तुंबळ हाणामारी होऊन दोन्ही गटांचे पाचजण जखमी झाले.
येथील सरपंच रंगीता देवबोने व ग्रामविकास अधिकारी रमेश मुळे हे ग्रामपंचायत कार्यालयात कार्यालयीन कामकाज करीत असतांना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास सोमनाथ पंढरीनाथ कुलते व त्यांचे मामा किसन जाधव व ग्रामपंचायत सदस्य रूपेश हे कार्यालयात आले. यावेळी प्लॉटिंगच्या कारणावरून सरपंच देवबोणे व किसन जाधव यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या वादावादीनंतर सरपंच देवबोणे व सदस्य रूपेश जाधव या दोघांच्या समर्थकांनी कार्यालयाबाहेर येऊन पुन्हा वाद उकरून काढला. यानंतर दोन्ही गटांतील वाद विकोपाला गेल्याने त्यांच्यात जोरदार हाणामारी सुरू झाली.
या हाणामारीच्या घटनेत सोमनाथ कुलते, सदस्य रूपेश जाधव व किसन जाधव यांना सरपंच देवबोणे यांचा भाऊ अंकुश देवबोणे, अक्षय त्यांच्यासोबतच्या दोघांनी मारहाण करून किसन जाधव यांच्या कार (एमएच २०, ईजे ०११५)च्या काचा फोडल्याची तक्रार देण्यात आली आहे; तर सरपंच रंगीता देवबोणे यांनी ग्रामपंचायत सदस्य रूपेश जाधव व त्यांच्यासोबत असलेल्यांनी आपणास व भाऊ अंकुश देवबोने यास मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.