औरंगाबाद : मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी शिवसंग्राम संघटनेने पडेगाव येथे आयोजित केलेल्या बैठकीत शिवसैनिकांनी राडा केला. शिवसैनिकांनी आमदार विनायक मेटे यांना शिवीगाळ करून त्यांचे भाषण बंद पाडले. बैठकीच्या संयोजकांना मारहाण करण्यात आली. ही घटना पडेगाव येथे गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर आ. मेटे यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस आयुक्तांची भेट घेतली व संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
शिवसंग्राम संघटनेचे शहराध्यक्ष उमाकांत माकणे यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पडेगाव आणि मिटमिटा येथील मराठा समाजातील लोकांची बैठक त्यांच्या मुलाच्या दवाखान्यात तिसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये आयोजित केली होती. आ. मेटे हे या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. ते बोलत असतानाच शिवसेनेचे कार्यकर्ते अंबादास म्हस्के, किसन घनवट, नवनाथ मुळे, राहुल यलची, सचिन घनवट, विजय वाघमारे यांच्यासह पाच ते सहा जण तेथे दाखल झाले. मेटे यांचे बोलणे खोडून काढत त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मेटे त्यांना शांत राहण्याचे सांगत असताना शिवसैनिक त्यांच्या अंगावर धावून गेले व त्यांना धक्काबुक्की केली. तेव्हा डॉ. अभिमन्यू उमाकांत माकणे यांनी त्यांना हॉलमधून बाहेर जाण्यास सांगत असतानाच त्यांनाही मारहाण करण्यात आली.
शिवसैनिकांनी अचानक केलेल्या राड्यामुळे ही बैठक उधळली गेली. या घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. याविषयी डॉ. अभिमन्यू माकणे यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या तक्रारीत शिवसैनिकांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील एक लाखाची सोनसाखळी तोडून नेली, तसेच आ. मेटे यांना शिवीगाळ करून धमकावल्याचे नमूद केले.