- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : जालना रोडवरील वरुड फाटा येथे अडीच एकर परिसरात श्री राधानिकुंज बिहारी मंदिर उभारले जात आहे. जमिनीपासून ते शिखरापर्यंत तब्बल १०६ फूट उंचीचे हे मराठवाड्यातील सर्वांत भव्यदिव्य मंदिर ठरणार आहे. यामुळे पर्यटनाच्या राजधानीत धार्मिक पर्यटनात हे वैदिक शिक्षण व सांस्कृतिक केंद्र भाविकांचे आकर्षण ठरेल.
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)च्यावतीने हे मंदिर उभारले जात आहे. मंदिर, भक्तनिवास, आश्रमासाठी सुमारे १ लाख चौरस फुटावर बांधकाम करण्यात येणार आहे. मुख्य मंदिराची उंची ५ मजली असणार आहे. यात पहिल्या मजल्यावर ६ हजार चौरस फुटाचे प्रसादालय व दुसऱ्या मजल्यावर राधानिकुंज बिहारीची मूर्ती व इस्कॉनचे संस्थापकाचार्य ए. सी. भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांची मूर्ती विराजमान असेल.
संपूर्ण मंदिराचे बांधकाम राजस्थानी शैलीत करण्यात येत आहे. यासाठी बाहेरील बाजूस ४२ हजार घन फूट ढोलपूर स्टोन व आतील बाजूस मकराना मार्बल बसविण्यात येणार आहे. ५ हजार चौरस फुटाचा सभामंडप उभारण्यात येत आहे. दुसऱ्या टप्यात ४० हजार चौरस फुटाचे भक्तनिवास व तेवढ्याच आकाराचा आश्रम असणार आहे. येथे बाल संस्कार केंद्र, वैदिक क्रीडा क्षेत्र, ई-ग्रंथालय, युवा प्रेरणा केंद्र, सेमिनार हॉल, कॉन्फरन्स हॉल, ओपन फंक्शन लॉन, फक्शन हॉल अशा सुविधा असणार आहेत. औरंगाबाद इस्कॉनचे अध्यक्ष डॉ. रोहिणीप्रिय प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या दोन वर्षांत संपूर्ण मंदिर उभारण्यात येईल, अशी माहिती डॉ. प्रेमपद दास यांनी दिली.
जयपूरहून येणार भगवंतांची मूर्तीराधानिकुंज बिहारी भगवंतांची साडेतीन फूट उंचीची संगमरवरी मूर्ती व इस्कॉन संस्थापक ए. सी. भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांची मूर्ती जयपूर येथील मूर्तिकार तयार करत आहेत. मंदिर उभारणीनंतर या भगवंतांच्या मूर्ती शहरात आणण्यात येणार आहेत.