औरंगाबाद : काँग्रेसने शेतीमालाला भाव दिला नाही म्हणून भारतीय जनता पार्टीला निवडून आणले. मात्र, सत्तेत आल्यावर त्यांनी स्वामीनाथन आयोगाने सुचविलेला भाव आम्ही देणार नाही, असे न्यायालयात सांगितले. सर्वाच्च न्यायालयही हा धोरणात्मक निर्णय असल्याने आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असा निर्णय दिला. सरकारचे धोरण शेतक-यांचे मरण असेल तर या प्रस्तापितांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करण्या शिवाय आमच्या समोर गत्यंतर नाही. परिणामी, देशभरातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी येथे एकत्र येऊन शेतक-यांचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नीती आयोगाचे तज्ञ समितीचे सदस्य व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली.
औरंगाबादेत शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत रघुनाथ पाटील यांनी सरकार सोबतच विरोधी पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवरही सडकून टिका केली. ज्यांनी सत्तेत असताना शेतीमालाला कधीच योग्य भाव दिला नाही. तेच आज जनआक्रोश व हल्लाबोल मोर्चा काढत आहे. त्यांना असा मोर्चा काढण्याचा काहीच अधिकार नाही. सत्तेच्या बाहेर गेल्यावर आता सगळे सांगतात कर्जची परतफेड करु नका, वीजबील भरू नका. मग सत्तेत होते तेव्हा त्यांनी काय केले, असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, नेहमी विरोधी पक्ष शेतक-यांच्या बाजूने बोलत असतो. पण तोच पक्ष सत्तेत गेल्यावर शेतक-यांचे प्रश्न, दु:ख विसरून जातो. हा अनुभव सातत्याने येत आहे चार वेळा देशातील सरकार बदलून सुद्धा धोरण बदलत नसल्यामुळे आम्ही शेतक-यांचे प्रश्न मांडणारे खासदार लोकसभेत पाठविण्यासाठी नवीन पक्ष स्थापन करणार आहोत. अजून नवीन पक्षाचे नाव निचित केले नाही. याबाबत लवकरच अलाहबाद येथे देशभरातील शेतकरी संघटनांची बैठक आहे. त्या राजकीय पक्षाच्या नावा संदर्भात चर्चा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
आगामी लोकसभा लढवणार प्रस्तापितांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करण्यासाठी शेतकरी संघटना राजकारणात उतरणार आहे. तसेच २०१९ मध्ये होणा-या लोकसभा निवडणूकीत आमचा नवीन पक्ष देशभरात उमेदवार उभे करणार आहे, अशी घोषणाही यावेळी रघुनाथ पाटील यांनी केली.